MG Astor Launched In India : दर महिन्याला एमजी मोटर कंपनी कारवर ग्राहकांना चांगल्या सवलती देत असते. पण, आता JSW MG मोटर कंपनीने भारतात ॲस्टर ( MG Astor) चे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. ॲस्टरच्या नवीन आवृत्तीमध्ये MY2024 मॉडेल आणि नवीन ब्रँडिंगबद्दल काही अपडेट्स देण्यात आले आहेत. MG ने त्यांच्या नवीन ॲस्टरला “ब्लॉकबस्टर एसयूव्ही” असे नाव दिले आहे. सणासुदीच्या काळात आपली विक्री वाढवण्यासाठी कंपनीने मर्यादित काळासाठी बाजारात काही बदल करून SUV च्या विशेष आवृत्त्या लाँच केल्या आहेत.

नवीन अवतारात अ‍ॅस्टरला एक अपडेटेड शाइन व्हेरिएंट म्हणजे पॅनोरॅमिक सनरूफसह दिला जाणार आहे. १२.४८ लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमत असलेली ही एसयूव्ही आता तिच्या सेगमेंटमधील पॅनोरॅमिक सनरूफ देणारी सर्वात परवडणारी एसयूव्ही ठरली आहे. तसेच यामध्ये सहा एअरबॅग्ज हे एक स्टँडर्ड फीचर असणार आहे.

याव्यतिरिक्त, अ‍ॅस्टर आता सर्व व्हेरिएंटसाठी ‘आयव्हरी इंटीरियर थीम’सह उपलब्ध असणार आहे. फक्त टॉप-स्पेक सॅव्ही प्रोमध्ये सांग्रिया ट्रिमचा (Sangria trim) पर्याय दिला जाणार आहे. इतर नवीन फीचर्समध्ये वायरलेस ॲण्ड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, आय-स्मार्ट २.९ ॲडव्हान्स्ड यूआय आणि फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स यांचा समावेश आहे.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर एमजी अ‍ॅस्टरमध्ये १०.१ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ६ स्पीकर ऑडिओ सिस्टम, ८० हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स, ऑटो डिमिंग आयआरव्हीएम आणि जिओची व्हॉइस रेकग्निशन सिस्टम यासारख्या सुविधा आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीत, एसयूव्हीमध्ये १४ लेव्हल २ आणि १४ ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) फीचर्स आहेत.

तसेच एक खास बदल म्हणून एमजी मोटरने १.३ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन लाइनअपमधून वगळले आहे. अ‍ॅस्टर आता १.५ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे, जे ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा ८ स्पीड सीव्हीटी ऑटोमॅटिक युनिटसह हाताने वापरले जाऊ शकते. ही मोटर १०९ बीएचपी आणि १४४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते; तर ॲस्टरची किंमत ९.९९ लाख रुपयांपासून १७.५६ लाख रुपयांपर्यंत आहे.