एमजी मोटर्सने आपल्या एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कारवर भरघोस सूट देऊन इलेक्ट्रिक वाहन बाजारात खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने गेल्या वर्षी लाँच केलेल्या इलेक्ट्रिक कारवर सूट देण्याची घोषणा केली आहे. या कारला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. दमदार फीचर्स, जबरदस्त रेंज आणि किमतही कमी त्यामुळे ही इलेक्ट्रिक कार ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. आता कंपनीने किमतीत कपात केल्यामुळे या कारची विक्री दणक्यात होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमजी मोटर्सने आपल्या Comet EV वर १.४० लाख रुपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सच्या Tiago EV ची बाजारपेठेतील वाढती स्पर्धा लक्षात घेता, Comet EV ची विक्री वाढवण्याचे हे धोरण असू शकते. कंपनी त्याच्या बेस मॉडेलवर ९९,००० रुपयांची सूट देत आहे. या ऑफरनंतर कॉमेट ईव्ही खरेदी करणे आता आणखी परवडणारे झाले आहे.

MG Comet EV तीन प्रकारांमध्ये विकली जाते ज्यामध्ये पेस, प्ले आणि प्लश या व्हेरिएंटचा समावेश आहे. त्यांच्या नवीन किमती अनुक्रमे ६.९९ लाख रुपये, ८.८८ लाख रुपये आणि ८.५८ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहेत. एंट्री लेव्हल व्हेरिएंट पेसची किंमत ९९,००० रुपयांनी कमी करण्यात आली आहे, ज्यामुळे त्याची किंमत ७.९८ लाख रुपयांवरून ६.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत खाली आली आहे. या किमतीत, कॉमेट ईव्ही आता देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बनली आहे. तर, Tiago EV ची किंमत ८.६९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

(हे ही वाचा : मारुतीने खेळला नवा गेम; १० महिन्यात १ लाख युनिट्सची विक्री झालेल्या कारचा आणला नवा एडिशन अन् बरेच फायदे)

Comet EV बद्दल बोलायचे झाले तर, मिड लेव्हल प्ले आणि टॉप लेव्हल प्लशच्या किमती १.४० लाख रुपयांनी कमी झाल्या आहेत. प्लेची किंमत आता ९.२८ लाख रुपये (एक्स-शोरूम) वरून ७.८८ लाख रुपये (एक्स-शोरूम) वर आली आहे, तर प्लशची किंमत ९.९८ लाख वरून ८.५८ लाख (एक्स-शोरूम) वर आली आहे.

ही इलेक्ट्रिक कार चीनच्या Wuling EV वर आधारित आहे जी तिच्या किमतीनुसार अनेक प्रगत वैशिष्ट्ये आणि जबरदस्त श्रेणीसह येते. ही कार १७.३kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे. ही कार बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर २३० किलोमीटरची ARAI प्रमाणित ड्राइव्ह रेंज देते. कंपनीने यामध्ये रियर-एक्सल-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर वापरली आहे जी ४२ bhp ची पीक पॉवर आणि ११० Nm टॉर्क देते.

या इलेक्ट्रिक कारची सिस्टीम ३.३kW AC चार्जिंगला सपोर्ट करते, जी बॅटरी ० ते १०० टक्के चार्ज होण्यासाठी सात तास घेते. १०-८० टक्के चार्ज होण्यासाठी फक्त पाच तास लागतात. कंपनीचा दावा आहे की, ही कार एक महिना चालवण्याचा खर्च फक्त ५०० रुपये आहे. ही कार आकाराने लाहान असूनही, यात ४ लोकांसाठी बसण्याची जागा आहे. आधुनिक काळातील तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन ही कार डिझाईन करण्यात आली आहे. 

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mg motor india has announced significant price reduction for electric car the mg comet ev pdb