MG Motor India च्या नवीन लाँच झालेल्या लक्झरी ब्रॅण्ड चॅनल MG Select ने आगामी ‘MG Cyberster’ची पहिली झलक दाखवली आहे; जी इलेक्ट्रॉनिक सीझर डोअर्ससह येईल. ही भारतात प्रथमच ‘इलेक्ट्रिक सीझर डोअर’सह येणार आहे. सीझर डोअर्स सहसा महागड्या स्पोर्ट्स कारमध्ये दिसतात आणि बहुतेक ते मॅन्युअल असतात; परंतु या एमजी रोडस्टरमध्ये इलेक्ट्रॉनिक सीझर डोअर्स आहेत, जे बटणाने अॅक्सेस केले जाऊ शकतात.
एमजी सायबरस्टरचा इतिहास
एमजी सायबरस्टर ही कार १९६० च्या दशकातील क्लासिक एमजी बी रोडस्टरचे विजनरी रिइंटरप्रिटेशन आहे. नव्या जनरेशनच्या गरजेनुसार ती तयार करण्यात आली आहे. या कारची डिझाईन आणि फीचर्स याला अतिशय प्रीमियम आणि स्पोर्टी लूक देतात. या कारकडे स्टेटस सिम्बॉल म्हणूनही पाहिले जात आहे. स्टाईल आणि इंजिनियरिंग यांचा सुरेख संगम त्यात पाहायला मिळतो.
डिझाईन आणि एक्स्टेरियर
एमजी सायबरस्टरची रचना अतिशय आकर्षक व आधुनिक आहे. त्याला स्पोर्ट्स कारचे एलिमेंट्स, तसेच फ्युचरिस्टिक टच दिले आहेत, जसे की शार्प लाइन्स, एरोडायनामिक शेप, व लो-रायडिंग प्रोफाईल. याला अॅडव्हान्स एलईडी लायटिंग सिस्टीम मिळते, त्यामध्ये बारीक हेडलाइट्स आणि मागील बाजूस फ्लोटिंग लाईट बार समाविष्ट आहे.
पॉवर आणि स्पीड
MG ने उघड केले की, आगामी दोन-सीटर इलेक्ट्रिक रोडस्टर ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्ससह येईल. हा सेटअप 528 bhp कमाल पॉवर आणि 725 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. त्याशिवाय ही कार ३.२ सेकंदांत प्रतितास ० ते १०० किमी वेग पकडू शकते.
बॅटरी आणि रेंज
MG Cyberster मध्ये 77 kWh चा लिथियम-आर्यन बॅटरी पॅक असेल. तो एका चार्जवर 570 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम असेल. या ओपन-टॉप स्पोर्ट्स कारचे वजन १,९८४ किलो असेल, जे इलेक्ट्रिक कारसाठी खूप जास्त आहे. सायबरस्टरची लांबी ४,५३३ मिमी, रुंदी १,९१२ मिमी आणि उंची १,३२८ मिमी असेल.
इतर वैशिष्ट्ये
आगामी एमजी सायबरस्टर २,६८९ मिमीच्या व्हीलबेससह येईल. MG सायबरस्टरचा यापेक्षा कमी व्हर्जन सादर करण्याचाही मानस आहे, जे रिअर-व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशनसह येईल. यात 295 BHP पेक्षा जास्त एकल मोटर जनरेटिंग पॉवर असू शकते आणि 64kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. सायबरस्टरचा RWD प्रकार एका चार्जवर 519 किमीची रेंज देऊ शकतो.
आगामी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 4-पिस्टन फिक्स्ड कॅलिपर आणि अत्यंत कठोर रोलबारसह ब्रेम्बो ब्रेक्स असतील. त्यात बोस ऑडिओ सिस्टीम आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8155 चिपवर चालणारी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम असेल.