तुम्ही लांब फिरण्यास गेला असाल आणि मध्येच टायर पंक्चर झाला तर काय अवस्था होईल सांगायला नको. फिरण्याची सर्व मजाच निघून जाईल त्याबरोबर मनस्ताप होईल तो वेगळा. जगभरात दरवर्षी सुमारे २०० दशलक्ष टायर वेळेपूर्वी पंक्चर होतात. रस्त्यावर पडलेल्या वस्तूंमुळे किंवा अयोग्य हवेच्या दाबामुळे निरुपयोगी होतात. पण पुढच्या काही वर्षात वाहनांचे टायर पंक्चर होण्याची समस्या दूर होण्याची शक्यता आहे. टायर उत्पादक कंपनी मिशलिन पंक्चर प्रूफ टायरवर काम करत आहे. मिशलिन शेवरले (Chevrolet)च्या बोल्ट इलेक्ट्रिक कारसाठी पंक्चर प्रूफ टायर तयार करत आहे. या टायरची रचना अशी केली आहे की, पंक्चरच होणार आहे. येत्या तीन ते पाच वर्षात मिशलिन या टायरचं व्यावसायिक उत्पादन सुरु करणार आहे. पंक्चर प्रूफ सिस्टीममुळे दरवर्षी टायर फाटण्याची संख्या कमी होईल आणि टायर निर्मिती आणि दोषपूर्ण टायर्सची विल्हेवाट लावण्यासाठी ऊर्जा आणि पैशाची बचत होईल.
प्रायोगिक तत्वावर २०२१ या वर्षात मिनी कूपर SE देखील मिशेलिन एअरलेस टायरसह सार्वजनिक रस्त्यावर धावली होती. मिशेलिनने २०१९ मध्ये अधिकृतपणे त्याचे एअरलेस टायर अप्टिस लाँच केले. परंतु त्याची निर्मिती प्रक्रिया एका दशकाहून अधिक काळ सुरू होती. मिशेलिन अप्टिस बेल्ट आणि स्पोकचे बनलेले आहे. यात वाहनाचे वजन वाहून नेण्याची क्षमता असून अनेक पातळ आणि मजबूत फायबरग्लास वापरून बनवले आहे. मिशेलिनने त्याच्या पंक्चर-प्रूफ टायर तंत्रज्ञानासाठी ५० पेटंट देखील दाखल केले आहेत, जेणेकरुन इतर कोणीही हे नावीन्य वापरू नये. अप्टिस टायर्सचा फायदा असा आहे की त्यात पंक्चर नाहीत. त्यामुळे गाडी चालवताना टायरमध्ये अचानक पंक्चर होऊन हवेचा दाब कमी होण्याचा धोका नाही.
मिशेलिन उत्तर अमेरिकेचे अध्यक्ष अॅलेक्सिस गार्सिन यांनी सीएनएन या अमेरिकन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “हे लक्षात घेण्यासारखे आहे की मिशेलिनने आधीच २०१९ मध्ये चेवी बोल्टचा वापर त्याच्या वायुविहीन टायर्सची चाचणी करण्यासाठी केला आहे. पण मिशेलिन एअरलेस टायर बसवलेली ही एकमेव कार नाही.”