देशात अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो.खराब रस्ते आणि वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात घडतात. काही अपघात इतके भीषण असतात की कायमचं अपंगत्व येतं. यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी पावलं उचलताना दिसत आहे. चारचाकी वाहनांमध्ये थ्री पॉइंट बेल्ट आणि सहा एअरबॅग्सचा प्रस्ताव पुढे केल्यानंतर दुचाकीसाठी नवे नियम तयार केले आहेत. चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी नियमावली आखली आहे. आता रस्ते व वाहतूक मंत्रालयाने मोटार अपघात दावे लवकर निकाली लागावे यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की, नवीन नियमाने तपशीलवार तपासणी, अपघात अहवाल (DAR) आणि रस्ते अपघातांच्या अहवालासह दावे लवकर निकाली लागावे यासाठी वेळ निश्चित केली आहे. नव्या नियमाबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वाहन विम्याच्या प्रमाणपत्रात वैध मोबाइल क्रमांक समाविष्ट करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू होतील.
नवीन वाहतूक नियमांनुसार दुचाकीस्वारांना मुलांसाठी हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट वापरणे अनिवार्य केले आहे, तसेच दुचाकीचा वेग फक्त ४० किमी प्रतितास इतका मर्यादित आहे. नवीन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास १ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल आणि चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. मुलांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. हा नियम चार वर्षांपर्यंतच्या मुलांना लागू असेल. नवीन नियमांनुसार, वापरलेले सुरक्षा हार्नेस हलके, जलरोधक, गादीयुक्त आणि ३० किलो भार वाहून नेण्याची क्षमता असणारे हवे. राइडरने मुलाच्या सुरक्षिततेसाठी हार्नेस घालणे आवश्यक आहे.
हिरो इलेक्ट्रिकनं Eddy स्कूटरचं केलं अनावरण; गाडी चालवण्यासाठी परवान्याची गरज नाही, जाणून घ्या
दुचाकी वाहनांसाठीच्या नवीन नियमांमध्ये चार वर्षांवरील मुलांनाही क्रॅश हेल्मेट किंवा सायकल हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. हेल्मेट शासनाने ठरवून दिलेल्या मानकांपैकी असायला हवं. मुलांसाठी हेल्मेट बनवण्यास केंद्राने निर्मात्यांना आधीच सूचित केले आहे. दुचाकीस्वारांना मुलांसोबत प्रवास करताना दुचाकीचा वेग ४० किमी प्रतितास पेक्षा जास्त नसावा याची खात्री करणे देखील नियमानुसार बंधनकारक आहे.