Maharashtra Samruddhi Mahamarg: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर ते शिर्डी या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात समृद्धी महामार्गावरून ५० हजारांहून अधिक वाहनांनी प्रवास केला असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यानंतर द्रुतगती महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. दुपारी २ वाजता हे महामार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.
द्रुतगती मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांची आणि चालकांची कुठेही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने घेण्यात आली आहे. नागपूर ते शिर्डी ५२० किमी आहे. शुक्रवारपर्यंत ५० हजारांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. तसेच या समृद्धी महामार्गावर तीन अपघात झाल्याचेही वृत्त आहे.
इंधनस्थळ: समृद्धी महामार्गावर नागपूरहून शिर्डीच्या दिशेने ७ ठिकाणी व शिर्डीहुन नागपूरच्या दिशेने ६ ठिकाणी अशा एकूण १३ ठिकाणी इंधनाची सोय करण्यात आलेली आहे.
(आणखी वाचा : तुमच्याही गाडीची Series Number Plate ‘ही’ आहे काय? मग हा नियम जाणून घ्या, अन्यथा…)
स्नॅक्स: या इंधन स्थानकावर स्नॅक्स, पिण्याचे पाणी तसेच टायर पंक्चर काढण्यासाठी व टायरमध्ये हवा भरण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे. तसेच वाहनाच्या किरकोळ दुरुस्तीची सुविधा इंधन स्थानकाजवळ पुरवण्यात आली आहे. याशिवाय १६ ठिकाणी महामार्ग सोयी सुविधा सुरु करण्याची प्रक्रिया सुरु असून लवकरच प्रवाशांना ती सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.
प्रसाधनगृह: या १३ इंधन स्थानकांवर प्रसाधनगृहाची सुविधा आहे. तसेच पथकर स्थानकांवर देखील प्रसाधन गृहांची सुविधा आहे. अपघाताच्या वेळेस अपघातग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी खालील प्रकारे सुविधा देण्यात आलेली आहे.
क्रेन: अपघातग्रस्त वाहन द्रुतगती मार्गावरुन बाजूला घेण्यासाठी ३० मेट्रिक टन क्षमतेची क्रेन २४ तास तैनात आहे. अपघाताची सूचना मिळताच क्रेन तातडीने घटनास्थळी पोहचेल. क्रेनची एकूण संख्या १३ आहे.
(आणखी वाचा : Electric Car vs petrol Car: कोणती कार ठरेल तुमच्यासाठी फायदेशीर? पेट्रोल की इलेक्ट्रिक ? वाचा सविस्तर)
सुरक्षा रक्षक: द्रुतगती मार्गावर सुरक्षेसाठी महामार्ग सुरक्षा पोलीस तैनात आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे एकूण १२१ सुरक्षा रक्षक महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त केलेले आहेत.
रुग्णवाहिका: अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एकूण १५ रुग्ण वाहिका आहेत. रुग्णवाहिका स्थानिक रुग्णालयांशी संलग्न ठेवण्यात आलेल्या आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरिता १०८ क्रमांकावर संपर्क करावा.
हेल्पलाईन क्रमांक: वाहनाचा बिघाड, अपघात झाल्यास हेल्पलाईन क्रमांक 1800 233 2233/ 8181818155 वर त्वरीत संपर्क करावा. सदर हेल्पलाईन क्रमांक महामार्गावर ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेले आहेत.