भारतात विकल्या गेलेल्या सर्व गाड्यांचा विक्री अहवाल समोर आला आहे. गेल्या महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, मारुती सुझुकी, महिंद्रा यांच्या कारच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे; पण टाटा आणि ह्युंदाईच्या विक्रीत घट झाली आहे.
यावेळी मारुती सुझुकीने यादीत अव्वल स्थान पटकावले आहे; तर महिंद्रानेही आपल्या बाजारपेठेत चांगली पकड निर्माण केली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये मारुती सुझुकीची भारतामध्ये प्रवासी वाहनांची (passenger vehicle) विक्री १,६०,७९१ युनिट्स होती; तर २०२४ मध्ये ही संख्या १,६०,२७१ युनिट्स होती. अशा परिस्थितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मारुतीच्या विक्रीत लक्षणीय वाढ मोठ्या प्रमाणात दिसून आली नाही. किंवा आपण असेही म्हणू शकतो की गेल्या वर्षीप्रमाणे कंपनीने चांगली विक्री करून आपले मार्केट मजबूत केले आहे.
मारुती आणि महिंद्रा
मारुतीच्या प्रवासी वाहनांच्या तुलनेत युटीलिटी वाहनांच्या विक्रीत ६.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मारुतीने ४८१ सेडान विकल्या होत्या; तर या वर्षी हा आकडा १०९७ वर पोहोचला आहे. महिंद्रानेही आपल्या विक्रीत लक्षणीय वाढ केली आहे. त्यांनी कारविक्रीत ह्युंदाई व टाटा या दोन्ही प्रसिद्ध कंपन्यांना मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. महिंद्राने भारतात ५०,४२० युनिट्सची विक्री केली आहे; तर गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीने फक्त ४२,४०१ युनिट्सची विक्री केली होती.
ह्युंदाईची विक्री
ह्युंदाईबद्दल बोलायचे झाले तर, फेब्रुवारी २०२५ मध्ये कंपनीने ४७,७२७ युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.९२ टक्के कमी आहे. कंपनीने त्यांच्या वाहनांच्या निर्यातीत ६.८ टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीने फेब्रुवारी २०२५ मध्ये ११ हजार वाहनांची निर्यात केली आहे. असे असूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीला या वर्षी २.९३ टक्के तोटा सहन करावा लागला आहे.
टाटाची विक्री
या यादीत टाटाचेही नाव आहे. त्यामध्ये फेब्रुवारी २०२४ च्या तुलनेत या वर्षी नऊ टक्के नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात कंपनीने ४६,४३५ युनिट्सची विक्री केली होती. त्यासोबतच टाटाला इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही तोटा सहन करावा लागला आहे. टाटाचे सुमारे २३ टक्के नुकसान झाले आहे; पण टाटाने वाहनांच्या निर्यातीत आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षी टाटाने फक्त ५४ युनिट्सची निर्यात केली होती, जी आता ३७६ युनिट्सपर्यंत वाढली आहे.