दादाचा आशीर्वाद, भाऊंची कृपा, आई-बाबाचं गिफ्ट, नुसता जाळ अन धूर अशा फॅन्सी नंबरप्लेट तुम्ही रस्त्यात येता-जाता पाहिल्या असतीलच, हो ना? असे प्रयोग करणाऱ्यांना हे फार कूल वाटत असलं तरी मोटार वाहन कायद्यानुसार हा दंडनीय गुन्हा आहे. याविषयी अनेकदा माहिती देऊनही अनेकजण नियम धाब्यावर बसवताना दिसतात. या मंडळींना नियमांची जाणीव करून देत मुंबई पोलिसांनी एक हटके इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. आजवर मुंबई पोलिसांच्या इंस्टा अकाउंटवरून अनेकदा मिश्किल अंदाजात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना कानटिचक्या दिल्या जातात, अशाच धाटणीची सध्याची पोस्ट आहे, यात नेमकं काय म्हटलंय चला पाहुयात..
मुंबई पोलिसांनी एका कस्टमाइझ नंबरप्लेटचा फोटो शेअर केला आहे. आपण नीट पाहिल्यास यात नंबर मधून नॉट ओके बॉस अशी अक्षरे दिसून येतात. यावरून “काही गोष्टी कधीही ओके नसतात! आपल्या वाहनावर शब्दांच्या, नावाच्या आकाराच्या नंबर प्लेट लावणे कायद्याने दंडनीय अपराध आहे”, असे कॅप्शन दिलेले आहे. डिजिटली लेजिट (स्पष्ट) दिसू द्या, बॉस या अशा नंबर प्लेट ओके नाहीत असेही या कॅप्शन मध्ये लिहिलेले आहे.
मुंबई पोलीस इंस्टाग्राम पोस्ट
कडक माल था! पोलिसांची इंस्टाग्राम पोस्ट पाहून नेटकरी हैराण; खरं कारण होतं…
दरम्यान , मोटार वाहन कायदा १९८९ नुसार, भारतात फॅन्सी नंबर प्लेट वापरणे बेकायदेशीर आहे. फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या लोकांवर प्रत्येक राज्यात कठोर कारवाई करण्याबाबत नियम आहे. प्रत्येक राज्यात आरटीओद्वारे जबरदस्त दंड आकारला जातो. महाराष्ट्रात फॅन्सी नंबरप्लेट वापरल्यास २००० ते ५००० दंड आकारला जाऊ शकतो.