New Car Buying Tips : जर तुम्हीही ३१ मार्च २०२५ पूर्वी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला खूप चांगले फायदे आणि डिस्काउंट मिळू शकतात. कारण सध्या अनेक कार डिलर्स त्यांचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी जबरदस्त डिस्काउंट ऑफर देत आहेत, यात मागील काही दिवसांपासून अनेक कार शोरुम्समध्येही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय, कारण १ एप्रिलपासून कार महागणार आहेत. पण, कार खरेदी करताना काहीवेळा ग्राहकांना फसवणुकीच्या घटनांचा सामना करावा लागतो.
काहीवेळा विक्रेते कारची ऑन-रोड किंमत खूप जास्त करून विकतात, ज्यामुळे ग्राहकाला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. वाहन विक्रेते अनावश्यक गोष्टी जोडून बिल बनवतात. वाहनाच्या ऑन-रोड किमतीत कर आणि विमा या गोष्टी समाविष्ट असतात.
परंतु, काहीवेळा विक्रेत्यांकडून या ऑन-रोड किमतीमध्ये इतर अनेक अॅक्सेसरीज आणि ऑफर्सदेखील जोडल्या जातात, ज्यामुळे वाहनाची ऑन-रोड किंमत खूप जास्त होते. आता जे पहिल्यांदाच नवीन कार खरेदी करतायत किंवा ज्यांना या गोष्टींविषयी माहिती नाही, असे ग्राहक डीलर्सच्या या जाळ्यात अडकतात आणि आपला खिसा रिकामा करून बसतात.
त्यामुळे तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही नवीन कारची ऑन-रोड किंमत कमी करू शकता.
एक्स-शोरूम ते ऑन-रोड किमतीत असतो ‘या’ गोष्टींचा समावेश
कोणत्याही नवीन कारच्या किमतीमध्ये एक्स-शोरूम किमतीसह रजिस्ट्रेशन, इन्श्युरन्स, एक्स्टेंडेड वॉरंटी प्राइज आणि विविध अॅक्सेसरीज यांचा समावेश असतो. पण, यातील इन्श्युरन्स आणि अॅक्सेसरीज वाढवणे किंवा कमी करणे हे तुमच्या हातात आहे, ज्यामुळे ऑन-रोड किंमत कमी करता येते.
तुम्ही ‘या’ गोष्टी करू शकता कमी
गाडी खरेदी करताना प्रथम प्राइस ब्रेकअप काळजीपूर्वक तपासा. यामधून तुम्ही अनेक गोष्टी काढून टाकू शकता. जर तुम्हाला डीलरकडून देण्यात येणारे कार इन्श्युरन्स समजत नसेल, किंमत जास्त वाटत असेल किंवा तुम्हाला इतर ठिकाणाहून चांगला इन्श्युरन्स मिळत असेल, तर तुम्ही शोरूमऐवजी बाहेरून कार इन्श्युरन्स खरेदी करू शकता, जो तुम्हाला स्वस्तात पडेल. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे गाडीची डिलिव्हरी घेताना तुमच्याकडे इन्श्युरन्सची कागदपत्रं असणं आवश्यक आहे, अन्यथा तुमची कार शोरूममधून बाहेर पडू शकणार नाही.
कार इन्श्युरन्सव्यतिरिक्त तुम्ही त्याचा एक्स्टेंडेंड वॉरंटी पॅकेजदेखील रद्द करू शकता. डीलर तुम्हाला वारंवार एक्स्टेंडेड वॉरंटी पॅकेज खरेदी करण्यास सांगेल, पण तुम्ही ते तुमच्या गरजेनुसार खरेदी करावे.
याशिवाय डीलर तुम्हाला नवीन कारवर अॅक्सेसरीज बसवण्यास गळ घालेल, कारण डीलर्सला अॅक्सेसरीजमधून जास्तीत जास्त नफा कमावता येतो. जर तुम्ही बाहेरून अॅक्सेसरीज बसवल्या तर कारची वॉरंटी रद्द होईल, अशी भीती डीलर तुम्हाला देईल. पण, जर तुम्ही कारमधील कोणतीही वायरिंग न कापता अॅक्सेसरीज बसवल्या तर वॉरंटीला कोणताही धोका पोहोचत नाही.
‘या’ गोष्टीही ठेवा लक्षात
जर तुम्हाला लोनवर कार घ्यायची असेल तर तुम्ही वेगवेगळ्या बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून रेट ऑफ इंटरेस्टची माहिती घेऊ शकता. विविध बँकांच्या रेट ऑफ इंटरेस्टची तुलना करून तुम्ही कोणती बँक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल हे ठरवू शकता. तुम्ही कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये लोन देणाऱ्या बँकेकडून लोन घेतले पाहिजे, यामुळे कोणतेही वाहन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.