New Cars Seat Covers : नवीन कार खरेदी केल्यानंतर अनेक जण त्या कारमधील सीट्सवरील प्लास्टिकचे कव्हर काढत नाहीत, हे तुमच्यापैकी अनेकांनी पाहिले असेल. सीट्स खराब होऊ नये म्हणून कंपन्या नव्या कारमधील सीट्स प्लास्टिकच्या पिशवीप्रमाणे दिसणाऱ्या कव्हरने पॅक करतात. ग्राहक हे कव्हर कार खरेदी केल्यानंतर काढू शकतात, पण अनेक जण तसे करत नाहीत. बरेच दिवस सीट्सवर प्लास्टिक कव्हर तसेच ठेवतात, पण असे करणे नुकसानकारक ठरू शकते; त्यामुळे नवीन कार खरेदी केल्यानंतर किती दिवसांनी प्लास्टिक कव्हर काढले पाहिजे? तसेच ते खूप दिवस असेच ठेवल्यास काय नुकसान होते जाणून घेऊ…

सीटवर प्लास्टिक कव्हर का लावले जाते?

कंपन्या नवीन कारच्या सीटवर प्लास्टिक कव्हर लावतात, जेणेकरून डिलिव्हरीपूर्वी कारच्या सीटवर कोणतेही डाग पडून त्या खराब होऊ नये किंवा सीटचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये.

हे प्लास्टिक कव्हर कधी काढणे गरजेचे?

नवीन कार खरेदी केल्यानंतर अनेक जण सीटवरील प्लास्टिक कव्हर तसेच ठेवतात, पण असे करणे योग्य नाही. सीट्सवर कव्हर जास्त दिवस तसेच ठेवल्यास कारचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नवीन कार खरेदी केल्यानंतर गाडीच्या सीटवरील प्लास्टिक कव्हर ताबडतोब काढून टाकले पाहिजे, असा सल्ला देण्यात आला आहे.

कारच्या सीटवर प्लास्टिक कव्हर तसेच ठेवण्याचे तोटे

१) उन्हाळ्यात जर तुम्ही नवीन कार खरेदी केली आणि त्या कारमधील सीटवरील प्लास्टिक कव्हर तसेच ठेवलेत तर त्यामुळे कव्हरमुळे गाडी खूप गरम होऊ लागते.

२) सीटवर लावलेले प्लास्टिक कव्हर गरम झाल्यावर कॅडमियम आणि क्लोरीनसारखे हानिकारक वायू बाहेर पडतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.

३) कारच्या सीटवर अनेक दिवस प्लास्टिक कव्हर तसेच ठेवल्यास त्यावर धूळ आणि घाण साचते. अनेकदा ही घाण सीटच्या आत जाऊन बसू शकते, जी काढणे कठीण होऊ शकते.

४) प्लास्टिकच्या कव्हर्समुळे कारच्या सीटवर बसणे सोयीचे वाटत नाही, अनेकदा अशा सीटवरून घसरायला होते.