Citroen eC3 Launch in India: कार निर्माता Citroen ने त्याच्या C3 हॅचबॅकच्या इलेक्ट्रिक व्हर्जनचे अनावरण केले आहे. फ्रेंच कंपनीने या कारच्या इलेक्ट्रिक व्हर्जनला eC3 असे नाव दिले आहे. कंपनीची ही नवीन कार देशात लाँच करण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारात ही इलेक्ट्रिक कार टाटाच्या टियागोला टक्कर देईल. या कारची डिलिव्हरी पुढच्या काही दिवसात सुरु होईल, अशी माहिती असून Citroen eC3 वर वॉरंटी दिली जात आहे.
Citroen eC3 कार डिझाइन
नवीन इलेक्ट्रिक कार eC3 चे डिझाईन Citroen च्या C3 मॉडेल सारखे आहे. Citroën eC3 ची रचना अंतर्गत ज्वलन इंजिनसह C3 मॉडेलप्रमाणेच केली गेली आहे. या eC3 कारमध्ये Citroën लोगो असलेली स्लीक ग्रिल दिसेल. नवीन इलेक्ट्रिक कारला सेमी-क्रॉसओव्हर डिझाइन देण्यात आले आहे.
Citroen eC3 कार सिंगल चार्जवर ३२० किमी पेक्षा जास्त रेंज देणार
आगामी Citroën eC3 २९.२kWh बॅटरीद्वारे समर्थित आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जवर ३२० किलोमीटर (ARAI) ची रेंज देईल. बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर एकत्रितपणे ५६ bhp पॉवर आणि १४३ Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीच्या या इलेक्ट्रिक कारचा कमाल वेग ताशी १०७ किलोमीटर आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करण्यात आला आहे. त्याच्या मदतीने ५७ मिनिटांत बॅटरी १० टक्के ते ८० टक्के चार्ज करता येते, तर १५ अँप सॉकेटच्या मदतीने बॅटरी १० टक्के ते १०० टक्के चार्ज होण्यासाठी १० तास ३० मिनिटे लागतात.
Citroen eC3 कारची वैशिष्ट्ये
ज्वलन इंजिनने सुसज्ज असलेल्या Citroën C3 मॉडेलच्या मॅन्युअल एसी व्हेरियंटमध्ये जी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, तीच वैशिष्ट्ये नवीन इलेक्ट्रिक कारमध्येही पाहायला मिळतील. Citroen eC3 कारमध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि अनेक डिजिटल उपकरणांसह १०-इंचाची इन्फोटेनमेंट प्रणाली आहे. कंपनीची नवीन इलेक्ट्रिक कार दोन ट्रिममध्ये उपलब्ध केली जाईल.
Citroen eC3 किंमत
Citroen eC3 कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे ११,५०,००० रुपये आहे. नवीन Citroen eC3 ऑल-इलेक्ट्रिक आता नवी दिल्ली, गुडगाव, मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, कोची, चेन्नई, चंदीगड, जयपूर या २५ शहरांमध्ये किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.