New-gen Maruti Suzuki Dzire Tour S launched: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारात त्यांच्या प्रसिद्ध सेडान कार मारुती डिझायरचे तिसऱ्या जनरेशनचे मॉडेल लाँच केले. पूर्णपणे नवीन लूक आणि मोठ्या बदलांसह सादर केलेली ही सेडान त्यावेळी फक्त खाजगी खरेदीदारांनाच ऑफर करण्यात आली होती. आता कंपनीने नवीन मारुती डिझायरची नवीन टूर एस आवृत्ती लाँच केली आहे, जी टॅक्सी/कॅब आणि फ्लीट सर्व्हिससाठी उपलब्ध असेल.

नवीन Dzire Tour S पेट्रोल इंजिनसह सीएनजी प्रकारातदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची सुरुवातीची किंमत ६.७९ लाख रुपये आहे, तर त्याच्या सीएनजी व्हेरिएंटची किंमत ७.७४ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या दोन्ही किमती एक्स-शोरूम आहेत. चला तर मग पाहूया की फ्लीट सर्व्हिसमध्ये दिल्या जाणाऱ्या डिझायर आणि खाजगी खरेदीदारांसाठी उपलब्ध असलेल्या नियमित डिझायरमध्ये काय फरक आहे.

Dzire Tour Sचा लूक आणि डिझाइन नियमित मॉडेलसारखेच आहे. टूर एस ही गाडी मूलतः LXi व्हेरिएंटवर आधारित असल्याने, डिझायरच्या उच्च व्हेरिएंटमध्ये आढळणारी चमक आणि ग्लॅमर यात नाही. फ्लीट-सेंट्रिक टूर एसमध्ये मध्यभागी ‘सुझुकी’ लोगोसह सिग्नेचर ग्रिल आणि समोर हॅलोजन हेडलॅम्प आहेत.

साइड प्रोफाइलमध्ये ब्लॅक आउट साइड रियर व्ह्यू मिरर (ORVM), ब्लॅक डोअर हँडल, बॉडी-कलर शार्क फिन अँटेना आणि कव्हरशिवाय १४-इंच स्टील व्हील्स आहेत. मागील बाजूस, कारमध्ये ब्रेक लाईट्ससह परिचित एलईडी टेललॅम्प आहेत, तसेच दोन्ही टोकांना जोडणारी ब्लॅक स्ट्रिप आहे. टेलगेटच्या खाली डाव्या बाजूला ‘Tour S’ काळी बॅजिंग देण्यात आली आहे, जी या गाडीला नियमित मॉडेलपेक्षा वेगळे करण्यात खूप मदत करते.

इंटेरियर आणि सेफ्टी फीचर्स

Dzire Tour S चे केबिन खूप नीटनेटके आणि स्वच्छ आहे. त्यात ड्युअल-टोन ब्लॅक आणि बेज थीम दिसते. या सबकॉम्पॅक्ट सेडानमध्ये फिजिकल कंट्रोल्ससह मॅन्युअल एअर कंडिशनिंग सिस्टम, दोन कप होल्डर्ससह सेंटर कन्सोल, मॅन्युअल गिअर शिफ्टर, चारही दरवाज्यांसाठी पॉवर विंडो, कीलेस एंट्री आणि अॅडजस्टेबल फ्रंट हेडरेस्ट अशा फीचर्सचा समावेश आहे. सुरक्षेसाठी यात सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), हिल होल्ड असिस्ट आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत.

पॉवर आणि परफॉर्मन्स

ही कार स्विफ्टच्या १.२ लिटर, ३ सिलेंडर ‘झेड’ सीरिज इंजिनसह उपलब्ध आहे. हे इंजिन ८१.५८ पीएस पॉवर आणि १११.७ एनएम टॉर्क जनरेट करते. हे नवीन इंजिन मागील मॉडेलपेक्षा अधिक उत्तम प्रकारे ट्यून केलेले आहे. नवीन डिझायरमध्ये कंपनीने सुसज्ज सीएनजी किटसह ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स पर्यायांचा समावेश केला आहे.

मायलेज

कंपनीचा दावा आहे की त्याचे मॅन्युअल व्हेरिएंट २४.७९ किमी, ऑटोमॅटिक व्हेरिएंट २५.७१ किमी आणि सीएनजी व्हेरिएंट ३३.७३ किमीपर्यंत मायलेज देईल. १५ इंचाच्या टायर्सवर चालणाऱ्या या सेडान कारमध्ये कंपनी ३७ लिटर पेट्रोल आणि ५५ लिटर सीएनजी टँक देत आहे.

यामुळे खाजगी खरेदीदारांना त्रास होऊ शकतो…

नवीनतम जनरेशन मारुती सुझुकी डिझायरच्या लाँचिंगच्या वेळी कंपनीने सांगितले होते की, ही कार कॅब आणि फ्लीट सेवांसाठी उपलब्ध राहणार नाही. यासाठी मागील जनरेशन डिझायर विकली जात होती. त्यावेळी असा अंदाज लावला जात होता की, कंपनीने नवीन डिझायरला प्रीमियम फील देण्यासाठी आणि कॅब आणि टॅक्सींमुळे या कारपासून दूर राहणाऱ्या लोकांना आकर्षित करण्यासाठी हे केले आहे. ५-स्टार रेटिंगसह येणाऱ्या या कॉम्पॅक्ट सेडानच्या टूर-एस वर्जन लाँचिंग, लूक आणि डिझाइनसह अनेक मोठे बदल, खाजगी खरेदीदारांना अस्वस्थ करू शकते.