Sell Two Helmets With Every Two Wheeler : भारतातील रस्ते सुरक्षा सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलताना, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक जबरदस्त घोषणा केली आहे. सर्व दुचाकी वाहनांना दोन आयएसआय प्रमाणित हेल्मेटही दिली पाहिजेत, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. तर नवी दिल्ली येथील ऑटो समिटमध्ये करण्यात आलेल्या या घोषणेला आयएसआय हेल्मेट उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणारी देशातील सर्वांत मोठी संघटना असलेल्या टू-व्हीलर हेल्मेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (टीएचएमए) ऑफ इंडियानेसुद्धा जोरदार पाठिंबा दिला आहे.

रस्ते अपघात रोखण्यासाठी गडकरी यांचे निर्देश एक महत्त्वाचा आणि दीर्घकाळ उपाय म्हणून पाहिले जात आहे. आयएसआय प्रमाणित हेल्मेट वापरण्याच्या सक्तीसाठी हेल्मेट उत्पादक संघटनेने मंत्र्यांच्या सक्रिय नेतृत्वाबद्दल मनापासून कौतुक केले आहे. THMA ने या निर्णयाचे खुल्या मनाने स्वागत केले आहे आणि “हे फक्त एक नियम नाही; ही एक राष्ट्रीय गरज आहे. ज्या कुटुंबांनी अपघातांमध्ये आपल्या प्रिय व्यक्ती गमावल्या आहेत, ज्यामध्ये तरुण मुले, मुली, पालक त्यांच्यासाठी हा खास निर्देश आशा निर्माण करतात की, भविष्यात असे नुकसान टाळता येईल”, असे THMA चे अध्यक्ष राजीव कपूर म्हणाले आहेत.

दोन हेल्मेट, काळाची गरज (Two Wheeler Safety) :

तर, भारतातील रस्ता सुरक्षेचे भयानक चित्र आकडेवारी दाखवते, जिथे दरवर्षी ४,८०,००० हून अधिक रस्ते अपघात होतात आणि १,८८,००० मृत्यू होतात. त्यापैकी ६६ टक्के अपघातांमध्ये १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचा समावेश असतो. दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये दरवर्षी ६९,००० हून अधिक मृत्यू होतात आणि ५० टक्के अपघात हे फक्त आणि फक्त हेल्मेट नसल्यामुळे होतात. पण, दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या दोघांनीही आयएसआय प्रमाणित हेल्मेट घालण्याची खात्री केल्याने प्रवास सुरक्षित आणि जबाबदारीचा ठरू शकतो.

असोसिएशनने गडकरी यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि भारतातील सुरक्षित व अधिक जबाबदार दुचाकी वाहतुकीच्या नवीन युगाकडे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून त्यांचे कौतुक केले. केंद्रीय परिवहन मंत्री देशातील वाहनसुरक्षेचे समर्थक आहेत. २०२३ मध्ये भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने त्यानंतर त्यांच्या एकूण सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठी डझनभराहून अधिक कारच्या क्रॅश चाचण्या घेतल्या आहेत.