केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही दिवसांपासून ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडीबद्दल चर्चा करत होते. अनेकदा त्यांनी आपल्या भाषणातून या गाडीचा उल्लेख केला होता. अखेर ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या Toyota Mirai या गाडीचं लाँचिंग झालं आहे. देशात ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणारी पहिली गाडी आहे. ही कार टोयोटा आणि किर्लोस्कर यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. मिराई म्हणजे जपानी भाषेत भविष्य. म्हणून या गाडीचं नाव टोयोटा मिराई असं ठेवण्यात आलं आहे. कारप्रेमींमध्ये टोयोटा मिराई या गाडीबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने कार पूर्णपणे सुरक्षित आहे. कारमध्ये सेन्सर असून कोणतीही अडचण आल्यास संपूर्ण यंत्रणा बंद करतात. टोयोटा मिराईमध्ये तीन हायड्रोजन सिलिंडर आहेत. कारच्या आत सिलिंडर अशा प्रकारे ठेवले आहेत की सुरक्षेचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. बुलेट प्रूफ सिलिंडर असल्याने कोणतंही नुकसान होणार नाही, याची खात्री देखील देण्यात आली आहे. मिराईमध्ये वापरण्यात आलेली फ्युएल सेल प्रणाली हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यातील अभिक्रियातून वीज निर्माण करते. कारमध्ये ऑनबोर्ड वीज तयार होते आणि कार धावते. या इंधनाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, “ग्रीन हायड्रोजन रिन्यूबल एनर्जी आणि बायोमासपासून बनवला जातो. यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही.” ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली आहे. ही कार यशस्वी झाल्यास आगामी काळात अशी वाहने देशभरात विकली जातील. अशा कार चालवणे पेट्रोल आणि सीएनजी कारपेक्षा खूपच स्वस्त असतील. ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या कारला प्रति किमी १ रुपये पेक्षा कमी खर्च येईल. पेट्रोलवर चालणाऱ्या कारला हाच खर्च ५ ते ७ रुपये प्रति किमी आहे. तर सीएनजी कारला हा खर्च ३ ते ४ रुपये प्रति किमी आहे.
कार लाँचिंग कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी आणि ऊर्जा आणि अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे उपस्थित होते.