Nitin Gadkari on Electric Vehicle Prices : भारतात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. दुसऱ्या बाजूला सरकार देखील या वाहनांना प्रोत्साहन देत आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. गडकरी म्हणाले की पुढील दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती या पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांइतक्याच होतील. ऑटोमोटिव्ह कम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसीएमए) ६४ व्या वार्षिक सत्रात ते बोलत होते. गडकरी म्हणाले, “अर्थमंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान दिल्यास आणखी फायदा होईल. तसेच त्या अनुदानास आमचा पूर्ण पाठिंबा असेल”.

नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं की “इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आता अनुदानाची आवश्यकता भासणार नाही. कारण इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवरील खर्च कमी होणार आहे. ग्राहक देखील आता पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय स्वीकारत आहेत”. भारतीय वाहन बाजारात गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या एकूण वाहनांपैकी ६.३ टक्के वाहनं ही इलेक्ट्रिक होती. त्याच्या आधीच्या वर्षी झालेल्या विक्रीच्या तुलनेत ही विक्री दुप्पट होती.

हे ही वाचा >> चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत

पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री म्हणाले, “मी पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या विरोधात नाही. मात्र भारताचं पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करायला हवं. आपण दर वर्षी २२ लाख कोटी रुपये केवळ पेट्रोल-डिझेलवर खर्च करतो. त्याऐवजी आपण इलेक्ट्रिक वाहनं व इथेनॉलसारख्या बायोफ्यूलवर लक्ष द्यायला हवं”.

हे ही वाचा >> नवीन कार घरी आणण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची तपासणी करणे गरजेचे? PDI टेस्ट म्हणजे काय? जाणून घ्या A TO Z माहिती

इथेनलॉच्या निर्मितीचा शेतकऱ्यांना फायदा, मक्याची किंमत वाढली : गडकरी

दरम्यान, गडकरी यांनी यावेळी सीएनजीच्या वापराबाबतही भाष्य केलं. सीएनजीदेखील उत्तम पर्याय असल्याचं गडकरी यांनी यावेळी नमूद केल. केंद्रीय मंत्री म्हणाले, “भारतात लाँच झालेली जगातली पहिली सीएनजी बाइक बजाज सीएनजीचं उदाहरण देत ते म्हणाले ही बाइक अवघ्या एक रुपयात एक किलोमीटर धावते. मात्र पेट्रोलवर चालणाऱ्या बाइकला एक किमी अंतर पार करण्यासाठी दोन रुपयांहून अधिक पैसे लागतात. दुसऱ्या बाजूला इथेनॉल हा देखील चांगला पर्याय आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे. वाढत्या बायोफ्यूलच्या म्हणजेच इथेनॉलच्या मागणीमुळे मक्याची किंमत देखील वाढली आहे”.