मारुती सुझुकी इंडियाने हायड्रोस्टॅटिक लॉक (इंजिनमध्ये पाणी शिरणे) आणि भेसळयुक्त इंधनामुळे इंजिन निकामी होणे किंवा ठप्प झाल्यास ग्राहकांना विशेष ‘कव्हर’ देण्याची घोषणा केली आहे.
ग्राहकांसोबत विक्रीनंतरची सेवा अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून देशांतर्गत बाजारपेठेतील सर्वात मोठ्या कार कंपनीने ग्राहक सुविधा पॅकेज (CCP) सादर केले आहे. या पॅकेजअंतर्गत वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्याने, चुकीच्या किंवा भेसळयुक्त इंधनामुळे होणारे नुकसान भरून काढले जाईल.
मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आणि भेसळयुक्त इंधनामुळे इंजिन बंद पडण्याच्या किंवा बिघाड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बॅनर्जी म्हणाले, “अशा परिस्थितीत ग्राहकांनी आता घाबरण्याची गरज नाही. ग्राहकांनी त्यांच्या वाहनाला पाणी साचलेल्या रस्त्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करावा.
आणखी वाचा : Bluetooth आणि Voice Assistance सह TVS स्कूटरचा Smart Connect अवतार लॉन्च
जर इंजिनमध्ये काही बिघाड झाला तर आम्ही त्याची काळजी घेऊ.” ते म्हणाले की या पॅकेजचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना नाममात्र रक्कम मोजावी लागेल. वॅगन आर आणि अल्टो ग्राहकांसाठी, ही रक्कम सुमारे ५०० रुपये असेल.
मारुतीने नुकतेच नेक्सा चेनमधून सीएनजी कार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये कंपनी प्रथम मारुती बलेनोचे सीएनजी व्हेरिएंट लॉन्च करू शकते. यासोबतच मारुतीने एरिना चेन अंतर्गत येणाऱ्या वॅगनआर, अल्टो आणि एर्टिगा सारख्या कारचे सीएनजी व्हेरिएंट लॉन्च केले आहेत.