Ola Electric हा भारतातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर ब्रॅण्ड आहे. ओला कंपनीच्या या EV विभागातील उत्पादनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांनी इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये ओला इलेक्ट्रिकला पसंती दिल्याचे कंपनीच्या मिळकतीवरुन लक्षात येते. एका महिन्यामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री करण्याचा विक्रम ओलाच्या नावावर होता. स्वत: रचलेला हा विक्रम ओला कंपनीने मे २०२३ मध्ये मोडला. त्यांनी मे महिन्यामध्ये सुमारे ३५,००० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली आहे. बंगळुरूमधील या कंपनीचे देशातील इलेक्ट्रिक स्कूटर प्रभागामधील मार्केट शेअर्स ३० टक्क्यांनी वाढले आहेत. सलग नऊ महिने सर्वाधिक इ-स्कूटर्स विकणारी ओला इलेक्ट्रिक ही एकमेव कंपनी आहे.
या विक्रमाबाबत ओला कंपनीने अधिकृत घोषणा केली होती. Autocarpro या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार,एप्रिल महिन्यात त्यांनी ३०,००० पेक्षा जास्त स्कूटर्स विकल्या होत्या. कंपनीने विक्रीत पूर्ण ३०० टक्के वाढ केल्याची माहिती समोर आली आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी या एकूण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सरकारी अनुदानात लक्षणीय घट झाल्याने आम्ही आमच्या वाहनांच्या किंमतींमध्ये किरकोळ वाढ केली आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढावा हे ओला इलेक्ट्रिकचे प्रयत्न सुरु आहेत.
Ola Electric च्या स्कूटर्सची वाढलेली किंमत
केंद्र सरकारने १ जूनपासून फेम-२ सबसिडीमध्ये घट करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे ओलासह अनेक EV क्षेत्रात असणाऱ्या बऱ्याच कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे जून महिन्यापासून 4 kWh बॅटरी पॅक असलेली S1 Pro स्कूटर खरेदी करण्यासाठी १,३९,९९९ रुपये द्यावे लागतील. तर 3 kWh बॅटरी पॅक असलेल्या S1 स्कूटरची किंमत १,२९,००० इतकी झाली आहे. तर 3 kWh ली-आयर्न बॅटरी पॅक असलेली S1 Air स्कूटर खरेदी करण्यासाठी १,०९,९९९ रुपये खर्च करावे लागतील.