ओला या लोकप्रिय कंपनीची ई-स्कूटर भर रस्त्यात जळत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पुण्यातील लोहेगाव भागातील असून घटना २६ मार्चला शनिवारी घडल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस १ प्रो आहे. ओला एस वनला आग खराब झालेल्या लिथियम आयन बॅटरीमुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज आहे. खरं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. लिथियम-आयन बॅटरीमध्ये आग विझवणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर लगेच हायड्रोजन वायू आणि लिथियम-हायड्रॉक्साइड तयार करते. लिथियम-हायड्रॉक्साइड अत्यंत ज्वलनशील असल्याने समस्या निर्माण होऊ शकते.
ई-स्कूटरला आग लागल्याच्या घटनेला कंपनीने दुजोरा दिला आहे. पुण्यातील ओला एस १ प्रो ला आग लागल्याची माहिती असून आगीच्या कारणाचा शोध घेत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ओलाने असा दावा केला की ग्राहक “पूर्णपणे सुरक्षित” आहेत. जोपर्यंत आगीच्या घटनेचा संबंध आहे, ओलाने सांगितले की ते येत्या काही दिवसांत आणखी अपडेट्स शेअर करेल आणि योग्य ती कारवाई करेल.
ओला एस १ मध्ये २.९७ किलोवॅट बॅटरी दिली आहे, तर एस १ प्रो मध्ये ३.९८ किलोवॅट बॅटरी आहे. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याने ग्राहकांमध्ये चर्चेचा विषय आहे. या घटनेमुळे खरेदीरांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. यावर लवकरच तोडगा निघेल असं काही जणांचं म्हणणं आहे.