Ola Lay off : ओला कंपनी आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत घट झाल्यामुळे सुमारे २०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत आहे. यात एएनआय टेक्नॉलॉजीचे विविध सॉफ्टवेअर वर्टिकलमधील कर्मचारी या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की यातील अनेक कर्मचारी असे आहेत, जे ओला अॅपच्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये काम करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या वतीने संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. ओलाने सोमवारी कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब केलाय आणि सांगितले की, हा कंपनीच्या मोठ्या लार्जर रिस्ट्रक्चरिंग एक्सरसाइजचा एक भाग आहे. भाविश अग्रवाल संचालित असलेल्या या ओला कंपनीत सुमारे २००० इंजिनीअर्स आहेत. पुढील १८ महिन्यांत आपला इंजिनिरींग टॅलेंट पूल ५,००० पर्यंत वाढवण्याचे ओलाचे उद्दिष्ट आहे.
आणखी वाचा : अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळतेय Royal Enfield Bullet 350; कुठे आणि काय आहे ऑफर? जाणून घ्या
ओला स्कूटर विक्रीत घट
मार्च महिन्यात ओला S1 स्कूटरला आग लागली होती. यानंतरही ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना लागोपाठ घडल्या आहेत. त्यामुळे कंपनीच्या स्कूटरची मागणी घटली आहे. ओला स्कूटरच्या सॉफ्टवेअर आणि बॅटरीच्या परफॉर्मन्सशी संबंधित ग्राहकांनी तक्रारी केल्या होत्या. एप्रिलपासून ओला स्कूटरच्या विक्रीत घट झाली आहे. वाहन नोंदणीच्या आकडेवारीनुसार, ओलाने ऑगस्टमध्ये ३,३५१ वाहने विकली जी गेल्या सहा महिन्यांत सर्वात कमी विक्री ठरली.
CNBC-TV18 ने दिलेल्या माहितीनुसार, ओला सर्व सॉफ्टवेअर टीम्समधून जवळपास २०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर – Ola S1 Pro स्कूटरच्या घसरत्या विक्री दरम्यान ले-ऑफच्या बातम्या येत होत्या. ओला इलेक्ट्रिक नॉन-सॉफ्टवेअर इंजीनियरिंग डोमेनवर लक्ष केंद्रित करत आहे. वाहन, सेल, इंजीनियरिंग आणि R&D क्षमता निर्माण करण्यावर स्पष्ट लक्ष केंद्रित करत आहे.
आणखी वाचा : ‘या’ तारखेला Tata Tiago EV ची एन्ट्री, सर्वात कमी किंमतीत मोठी ड्रायव्हिंग रेंज मिळू शकते
यावेळी एएनआय टेक्नॉलॉजीजच्या स्वत:च्या विविध सॉफ्टवेअर वर्टिकलमधून टाळेबंदी केली जात आहे जी ओला कॅबमध्ये कार्यरत आहे. कंपनीच्या मुख्य राइड-हेलिंग व्यवसायात, भाविश अग्रवाल चालवतात, सुमारे १,११० कर्मचारी आहेत. ओलाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपली इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून, कंपनी तिच्या इलेक्ट्रिक वाहन विभागाचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. ओला कार्स आणि क्विक कॉमर्स व्यवसाय ओला डॅश बंद झाल्यामुळे कंपनीने यापूर्वी सुमारे २००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील टीमच्या सदस्यांसह ३० हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत कंपनी सोडली आहे. या वर्षी जुलै महिन्यात ओला इलेक्ट्रिकचे चार्जिंग नेटवर्क हेड यशवंत कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, २०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या कामावरून कमी करण्याबाबत कंपनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ओलाच्या प्रवक्त्याने नोकरीवरून काढल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येवर भाष्य करण्यास नकार दिला.