भारतात मागच्या काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनं खरेदीसाठीचा ओढा वाढला आहे. भारतातच नाही तर संपूर्ण जगात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे देश विदेशातील कंपन्या या या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. आता या लिस्टमध्ये स्मार्टफोन कंपनी ओप्पो सहभागी होणार आहे. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार आणण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे. २०२४ मध्ये भारतात इलेक्ट्रिक कार आणण्याचा कंपनीचा मानस आहे. मात्र कंपनीने याबाबतची अजूनही घोषणा केलेली नाही. असं असलं तरी कंपनीने ट्रेडमार्क फाइल्समधून याबाबतची माहिती समोर आली आहे. याबाबतच्या काही ट्रेडमार्क फाइल्स लीक झाल्या होत्या. त्यानुसार ओप्पो इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात उतरणार असल्याचं दिसत आहे.
रियलमी, विवो आणि वनप्लस या सारख्या स्मार्टफोन कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता पाहता या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्यामुळे ओप्पो व्यवसाय वृद्धी आणि इतर कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी या क्षेत्रात उतरणार आहे. यासाठी कंपनीने योजना आखल्याचं बोललं जात आहे. ओप्पो सध्या इलेक्ट्रिक कारवर काम करत असून २०२४ मध्ये लॉन्च करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती लोकप्रियता पाहता ओप्पो लवकरच या दिशेने पाऊल उचलेल असं दिसतंय.
जागतिक ईव्ही मार्केटमध्ये टेस्लाची मोठी आघाडी आहे. तर इतर कंपन्या आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चीन ही जगातील सर्वात मोठी ईव्ही बाजारपेठ आहे. त्यामुळे, येत्या काही महिन्यांत आणि वर्षांमध्ये बॅटरी पॉवरचा कसा अवलंब करायचा याबाबत भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे