PDI Importance: आपल्या हक्काची दुचाकी किंवा चारचाकी असावी असे आपल्यापैकी बहुतांश लोकांना वाटत असते. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात गाड्यांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यातही सेकंड हॅन्ड गाडी घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. ओएलएक्स, बाईक देखो अशा कंपन्यांमुळे सेकंड हॅन्ड गाड्यांची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी-विक्री होत आहे. गाडी खरेदी केल्यानंतर ती घरी नेण्याआधी प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन करणे आवश्यक असते. याला ‘पीडीआय’ (PDI) असेही म्हटले जाते.
शोरुम किंवा डिलरकडून गाडीची डिलिव्हरी घेण्याआधी म्हणजेच गाडी घरी नेण्याआधी ठराविक गोष्टी पाहिल्या जातात. हे केल्याने विकत घेतलेल्या गाडीमध्ये दोष तर नाही ना याची खात्री केली जाते. एकूण व्यवहार झाल्यानंतर दोषयुक्त गाडी देऊन फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण सध्या वाढले आहेत. असे तुमच्याबरोबर घडू नये असे वाटत असेल, तर प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन करायला विसरु नका.
गाडीची डिलिव्हरी घेण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या तपासणीच्या प्रक्रियेला ‘प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन’ किंवा ‘पीडीआय’ म्हटले जाते. ऑटो क्षेत्रातील तज्ञ मंडळींना याबाबतची संपूर्ण माहिती ठाऊक असते. तुम्ही ज्या व्यक्तीकडून गाडी खरेदी करत आहात, त्या व्यक्तीने गाडीविषयी केलेले दावे खरे आहेत की नाही हे तपासण्यासाठी पीडीआयची मदत होते. गाडीचे इन्स्पेक्शन करताना निष्काळजी दाखवणे नुकसानदायक असते. अशा वेळी शक्य असल्यास अनुभवी व्यक्तींना सोबत घेऊन जावे.
गाडी खरेदी करताना मॉडेल, किंमत, फिचर्स अशा सर्व गोष्टींची माहिती मिळवणे ग्राहकासाठी आवश्यक असते. अपूऱ्या माहितीच्याआधारे जर तुम्ही व्यवहार केलात, तर तुमची फसवणूक होऊ शकते. ज्या ठिकाणाहून गाडी विकत घेणार आहात, तेथून संपूर्ण माहिती मिळवणे हा तुमचा अधिकार आहे. तेव्हा गाडीबद्दलची तुम्हाला सांगितलेली माहिती आणि कागदपत्रांमधील माहिती समान आहे ना याची खात्री करुन घ्यावी. पैसे भरण्याआधी कागदपत्रांची सत्यता तपासून घ्यावी. रोड टॅक्स रजिट्रेशनची कॉपी घ्यायला विसरु नये. गाडीच्या नंबरविषयीही नीट चौकशी करावी.
जर गाडी खरेदी करताना वॉरंटी मिळत असेल, तर संबंधित कागदपत्रे सांभाळून ठेवावी. त्याची एखादी झेरॉक्स कॉपी स्वत:कडे ठेवावी. त्याव्यतिरिक्त रोड साइड असिस्टंट कॉपी, ऑनर मॅन्यूअल, सर्व्हिस बुकलेट, पॉल्यूशन सर्टिफिकेट अशी महत्त्वपूर्ण कागदपत्रांची विक्रेत्याकडे हक्काने मागणी करावी. टायर्स, पार्किंग सेंसर, म्यूझिक सिस्टीम या गोष्टी देखील तपासून घ्याव्यात. वरवर नजर मारतानाही दरवाजे नीट आहेत ना, रंग व्यवस्थितपणे लावला आहे ना, डेंट पडला नाहीयेना हे निरखून पाहावे. सेकंड हॅन्ड गाडी घेत असल्यास जास्त सावधगिरी बाळगावी.