सध्या बातम्यांमधून, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमधून रस्त्यावर घडणाऱ्या अपघातांच्या कितीतरी घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. इतकेच नाही तर वाहनांच्या अपघातांमधून कितीतरी लोकांनी विनाकारण आपले जीव गमावले आहेत. शहरांमध्ये प्रवास करताना आपल्या वाहनांची काळजी घेणे, त्याचबरोबर गर्दीतील इतर प्रवाशांची काळजी घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य असते.
मात्र, कधीकधी वाहन चालवताना ट्रॅफिकमध्ये, अरुंद रस्त्यांवर गाड्यांची किरकोळ ठोकाठोकी होते. अशा वेळेस आणि सध्याच्या इतर घटनांकडे पाहता, अशा गोष्टी कॅमेऱ्यात कैद झालेल्या केव्हाही वाहनचालकासाठी फायदेशीर ठरू शकतात. गाडीला कोणतीही इजा झाली असल्यास, घटनेची शहानिशा त्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या फुटेजवरून करता येऊ शकते. म्हणूनच सध्या अनेक जण आपल्या वाहनामध्ये ‘डॅशकॅम’ लावून घेण्यास आग्रही असतात.
बाजारामध्ये विविध प्रकारचे आणि विविध किमतीचे डॅशकॅम उपलब्ध आहेत. वाहनांमध्ये लागणाऱ्या या डॅशकॅममध्ये व्हिडीओ शूट करण्याव्यतिरिक्त अजूनही अनेक फीचर्स उपलब्ध असतात. विशेषतः या कॅमेऱ्यांमध्ये ADAS फीचरदेखील उपलब्ध असतात. तुम्हालादेखील तुमच्या वाहनात डॅशकॅम लावायचा असल्यास, सेफ कॅम्स R2 डॅशकॅमबद्दल माहिती पाहा.
सेफ कॅम्स R2 डॅशकॅम [Safe Cams R2 dashcam]
डिझाइन आणि बनावट
सेफ कॅम्स R2 डॅशकॅम मेटल बॉडीसह येत असून त्याचा आकार एखाद्या कॅप्सूलसारखा आहे, त्यामुळे या कॅमेऱ्याची रचना अतिशय आटोपशीर आहे. कॅमेऱ्याच्या बाजू या गोलाकार असून त्यावर चंदेरी रंगाचे डिझाइन आहे. या कॅमेऱ्याच्या एका बाजूस USB पोर्ट देण्यात आला आहे, ज्याचा वापर चार्जिंग केबल कनेक्ट करण्यासाठी केला जातो; तर दुसऱ्या बाजूला हे उपकरण सुरू करण्यासाठी एक पूश बटण देण्यात आले आहे.
कंपनी डेटा स्टोरेजसाठी ६४ GB SD कार्ड असणारा डॅशकॅम देते. या R2 कॅममध्ये दोन प्रकार येतात. एक कॅमेरा हा GPS सह येतो, तर दुसरा कॅमेरा GPS शिवाय येतो. मात्र, पाहताना दोन्ही प्रकारचे कॅमेरे हे एकसारखेच दिसतात.
या कॅमेऱ्याला वाहनामध्ये लावणेदेखील अतिशय सोपे असून, व्यक्ती स्वतः हे काम करू शकते. यासाठी वाहनामधील गमिंग पॅडचे कव्हर काढून कॅमेरा योग्य ठिकाणी लावायचा आहे. या कॅमेरासह येणाऱ्या लांब पॉवर केबलला डिव्हाईस जोडून, कॅमेरा लेन्स सुरू करावा. डॅश कॅमेरा आणि वायर गाडीला कशी जोडायची याचे मार्गदर्शन करणारे एक टूलकिटदेखील बरोबर येते. तसेच, कंपनीकडूनदेखील तुम्ही हा डॅशकॅम गाडीत योग्य पद्धतीने बसवू शकता. यासाठी व्यक्तीला ७०० रुपये शुल्क द्यावे लागेल, असे हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून समजते.
डॅशकॅम ॲप इंटरफेस आणि उपयुक्तता
सेफ कॅम्स R2 डॅशकॅम चालवण्यासाठी एक ॲप्लिकेशन येते. हे ॲप्लिकेशन अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर काम करते. Christened Viidure हे ॲप मोबाइलमध्ये घेतल्यानंतर, ते गाडीमध्ये बसवलेल्या डॅशकॅमबरोबर जोडावे. हे ॲप कॅमेराद्वारे शूट होत असलेले लाईव्ह फीड दाखवण्याचे काम करते. यात तुम्ही किमान एक मिनिट आणि जास्तीत जास्त पाच मिनिटांची क्लिप सेव्ह करू शकता. तसेच, फोनच्या मदतीने तुम्ही या डॅशकॅममधून फोटोदेखील काढू शकता. डॅशकॅमसाठी आपला मोबाइल एखाद्या रिमोटसारखे काम करतो.
R2 डॅशकॅमची कामगिरी [performance]
सेफ कॅम्सचा R2 डॅशकॅम हा 1080p full HD क्वॉलिटीचा आहे, त्यामुळे यामधून शूट होणाऱ्या सर्व गोष्टी या हाय क्वॉलिटीमध्ये कैद होतात. व्हिडीओसह फोटोदेखील एचडी क्वॉलिटीमध्ये काढले जातात. या डॅशकॅमची अजून एक खासियत म्हणजे, हा कॅमेरा केवळ व्हिडीओ दृश्य स्वरूपात शूट करत नाही तर व्हिडीओसह त्याचा आवाजदेखील कैद करतो. यामुळे कोणत्याही घटनेदरम्यान झालेले संभाषण वा इतर आवाज सेव्ह केले जातात.
R2 डॅशकॅम गाडी पार्किंमध्ये उभी असतानादेखील आपले काम करत असतो, असा सेफ कॅम्स कंपनीचा दावा असल्याचे हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून समजते. या सुविधेमुळे गाडी सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकते. तसेच जर वाहनाचा अपघात झाला, तर त्यावेळेस डॅशकॅमने कैद केलेल्या त्या व्हिडीओची क्लिप लॉक होते. यामुळे अपघात झालेल्या गाडीच्या मालकास, अपघाताचा पुरावा दाखवण्यास मदत होऊ शकते.
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर या R2 नॉन-GPS डॅशकॅमची किंमत ही सध्या ७,१९९ रुपये इतकी आहे. हा कॅमेरा वाहनचालकांसाठी उपयुक्त ठरू शकतो. अशी सर्व माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून समजते.