रेनॉ इंडिया कंपनीसाठी या वर्षाची (२०२३) सुरुवात वाईट झाली आहे. कंपनीचे जानेवारी २०२३ मधील विक्रीचे आकडे चिंताजनक आहेत. कंपनीने वार्षिक आणि मासिक आधारावरील विक्रीत मोठी घट नोंदवली आहे. रेनॉ कंपनीने जानेवारी महिन्यात केवळ ३,००८ गाड्या विकल्या आहेत. जानेवारी २०२२ मध्ये हीच संख्या ८,११९ युनिट्स इतकी होती. तर डिसेंबर २०२२ मध्ये रेनॉ कंपनीने ६,१२६ युनिट्स विकले होते. म्हणजेच रेनॉच्या विक्रीत मासिक ५०.९० टक्के तर वार्षिक विक्रीत ६३ टक्के घट झाली आहे.
कंपनीची लोकप्रिय कार क्विडची बाजारातली पिछेहाट रेनॉसाठी चिंतेचा विषय आहे. कारण कंपनीने गेल्या महिन्यात क्विडचे केवळ ५९ युनिट्स विकले आहेत. जानेवारी २०२२ मध्ये हीच संख्या २,३४४ युनिट्स इतकी होती. या कारच्या विक्रीत तब्बल ३८७२ टक्के घट झाली आहे. हे आकडे पाहून असं वाटतं की, लोकांनी या कारकडे पाठ फिरवली आहे. दुसऱ्या बाजूला रेनॉ क्विडची स्पर्धक कार मारुती अल्टो ही बाजारात पहिल्या नंबरवर आहे.
भारतात १ एप्रिलपासून कार्सच्या इंजिनशी संबंधित अॅडव्हान्स एमिशन नॉर्म्स लागू होणार आहेत. हे नवीन उत्सर्जन मानदंड पूर्ण करणे सर्व वाहन कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. देशातलं वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. नवीन एमिशन नॉर्म्स आरडीई म्हणजेच रियल ड्रायव्हिंग एमिशन या नावाने ओळखले जातात. परंतु रेनॉ क्विड ही कार आरडीईनुसार अपडेट केली जाणार नाही. म्हणूनच कंपनी आता उपलब्ध असलेल्या कार्सचा स्टॉक रिकामा करतेय. याचाच अर्थ ३१ मार्च २०२३ पर्यंत रेनॉ क्विड भारतीय बाजाराचा निरोप घेऊ शकते.
हे ही वाचा >> नवीन बॅटरी पॅकसह लॉन्च झाल्या Ola S1 और S1 Air Scooter ,जाणून घ्या खासियत, किंमत अन्…
रेनॉ क्विडकडे ग्राहकांनी फिरवली पाठ
क्विडच्या गेल्या ६ महिन्यातील विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येईल की, या कारच्या विक्रीत ऐतिहासिक घट झाली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये कंपनीने या कारच्या २,००१ युनिट्सची विक्री केली होती. ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत दर महिन्याला कंपनीने या कारच्या १,००० युनिट्सहून अधिक गाड्यांची विक्री केली आहे. गेल्या पाच महिन्यात कंपनीने या कारच्या सरासरी १,७८४ युनिट्सची विक्री केली आहे. परंतु आता ही विक्री थेट ५९ युनिट्सवर आली आहे. त्यामुळे ही कार आता भारतीय बाजाराचा निरोप घेईल असा अंदाज वर्तवला जात आहे.