भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा उत्तरखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पंत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उत्तराखंडमधील देहरादून येथे मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतरचे पंतच्या गाडीचे फोटो, सीसीटीव्ही फुजेट समोर आले असून यामधून अपघाताची दाहकत दिसून येत आहे. मात्र पंत चालवत होता ती गाडी नेमकी कोणती होती? हा अपघात झाला तेव्हा तोच गाडी चालवत होता की त्याच्याबरोबर कोणी होतं? तो नेमका बाहेर कसा पडला यासारखे प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पंतची ही गाडी पाच वर्षांपूर्वीच घेतली होती अशी माहिती समोर येत आहे.
पंत शुक्रवारी पहाटच्या सुमारास नवी दिल्लीवरुन रुरकी या आपल्या मूळ गावी जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये पंतची गाडी रेलिंगला धडकली आणि नंतर तिने पेट घेतला. अपघातात पंतची गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आङे. सोशल मीडियावर काही ठिकाणी ही गाडी बीएमडब्यू कंपनीची असल्याचे दावे केले जात आहे. मात्र जळलेल्या अवस्थेमधील या गाडीच्या चाकांवरील लोगो आणि इतर माहितीवरुन ही गाडी मर्सिडीज कंपनीची असल्याचं स्पष्ट होतं आहे.
नक्की पाहा >> Rishabh Pant Car Accident Photos: काळ आला होता पण…; क्षणात खाक झाली पंतची स्पोर्ट्स कार; रुग्णालयातील फोटोही आले समोर
पंतच्या पाठीला आणि हातापायाला गाडीने पेट घेतल्यामुळे किरकोळ जखमा झाल्या आहेत. पंतवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. पंत गाडीच्या खिडकीची काच फोडून बाहेर पडल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. पंत बाहेर पडल्यानंतर गाडीने पेट घेतला आणि काही क्षणांमध्ये तिचा कोळसा झाला.
‘डीएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार पंतची अपघातग्रस्त गाडी ही मर्सिडीज-बेन्झ कंपनीची जीएलसी एसयूव्ही आहे. ही गाडी पंतने २०१७ मध्ये म्हणजेच वयाच्या १९ व्या वर्षी घेतली होती. त्याने या गाडीचे अनेक फोटो सोशल मीडियावरुन पोस्ट केलो होते. ही गाडी २.० लीटर पेट्रोल इंजिन किंवा २.२ लिटर डिझेल इंजिनसहीत येते.
नक्की पाहा >> Rishabh Pant Accident CCTV: ऋषभ पंतच्या अपघाताचं सीसीटीव्ही आलं समोर, पाहा व्हिडीओ
दिल्ली ते रुरकी हा अंदाजे १८८ किमीचा प्रवास करत असतानाच पंतच्या गाडीचा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी पंतच गाडी चालवत होता अशी माहिती पोलिसांनी दिली असून पंतशिवाय गाडीमध्ये कोणीही नव्हतं असंही त्यांनी सांगितलं. “साडेपाचच्या सुमारास आम्हाला क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्याला रुरकीच्या साक्षमा रुग्णालयामध्ये प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आलं. नंतर त्याला देहरादूनमधील रुग्णालयात हलवण्यात आलं. अपघात झाला तेव्हा तोच गाडी चालवत होता. तो एकटाच गाडीमध्ये होता,” अशी माहिती हरिद्वार ग्रामीचे पोलीस निरिक्षक एस. के. सिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
नक्की वाचा >> Rishabh Pant Car Accident: “गरज पडल्यास त्याच्यासाठी…”; उत्तराखंडच्या CM चे निर्देश! जाणून या अपघातासंदर्भातील १० अपडेट्स
अशाप्रकारे प्रसिद्ध व्यक्तींच्या मर्सिडीज कंपनीच्या गाडीचा अपघात होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याच वर्षी ४ सप्टेंबर रोजी उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये अपघाती मृत्यू झाला तेव्हाही गाडी मर्सिडीज कंपनीचीच होती. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला काही आठवड्यांपूर्वीच हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज हे एका अपघातातून थोडक्यात बचावले. हा अपघातही त्यांच्या मर्सिडीज गाडीलाच झाला होता.
पंतच्या ज्या मर्सिडीज-बेन्झ कंपनीची जीएलसी एसयूव्ही गाडीचा अपघात झाला आहे तिची किंमत ६७ लाख रुपये इतकी असल्याचं समजते.