Royal Enfield ही कंपनी भारतातल्या ३५० सीसी इंजिनवाल्या मोटरसायकल्सच्या सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. कंपनी या सेगमेंटमध्ये क्लासिक, हंटर, मीटिअर, इलेक्ट्रा आणि बुलेटसारखे अनेक मॉडेल्स विकते. त्यामुळेच या सेगमेंटवर रॉयल एनफील्ड कंपनीचा दबदबा आहे. या बाइक्सना हार्ले डेव्हिडसन, टायम्फ, येज्दी, होंडा, जावा या कंपन्यांकडून थोडीफार स्पर्धा मिळतेय, परंतु एनफील्डचा भारतीय बाजारावर वरचष्मा आहे.
जून २०२३ मधील विक्रीबद्दल बोलायचं झाल्यास ३५० सीसी सेगमेंटमध्ये गेल्या महिन्यात ३८ टक्के विक्री वाढली आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये ६९,०४६ युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात या सेगमेंटमध्ये ४९,७७३ युनिट्सची विक्री झाली होती. या सेगमेंटमध्ये १९,२७३ युनिट्सची विक्री वाढली आहे. तर मे २०२३ मधील विक्रीच्या तुलनेत यात ३.२१ टक्के घट झाली आहे. मे महिन्यात या सेगमेंटमध्ये ७१,३३६ युनिट्सची विक्री झाली होती.
या सेगमेंटवर रॉयल एनफील्डच्या क्लासिक ३५० या बाइकचा दबदबा आहे. गेल्या महिन्यात कंपनीने या बाइकच्या २७,००३ युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात कंपनीने या बाइकच्या २५,४२५ युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच या बाइकच्या वार्षिक विक्रीत यंदा ६.२१ टक्के वाढ झाली आहे. मे २०२२ मध्ये कंपनीने या बाइकच्या २६,३५० युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच या बाइकच्या मासिक विक्रीत २.४८ टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजारात क्लासिक ३५० या एकट्या बाइकची ३९.११ टक्के हिस्सेदारी आहे.
या सेगमेंटमध्ये दुसरा क्रमांक आरई हंटर ३५० या बाइकने पटकावला आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या बाइकच्या १६,१६२ युनिट्सची विक्री केली आहे. या बाइककडे २३.४१ टक्के बाजार हिस्सेदारी आहे. रॉयल एनफील्ड बुलेट ३५० ही बाइक या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या बाइकच्या ८,०१९ युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने बुलेटच्या ५,८९३ युनिट्सची विक्री केली होती. या बाइकच्या विक्रीत ३६.०८ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने मे २०२३ मध्ये बुलेटच्या ८,३१४ युनिट्सची विक्री केली होती. या बाइकच्या मासिक विक्रीत ३.५५ टक्के घट झाली आहे.
हे ही वाचा >> लय भारी! पावसाळ्यात कारसाठी बटाट्याचा भन्नाट जुगाड; या समोर मोठी टेक्नोलॉजीही पडेल फेल
या यादीत मीटियर ३५० ही बाइक ६,८६४ युनिट्स विक्रीसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ इलेक्ट्रा ३५० ही बाइक ४,३२० युनिट्स विक्रीसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर सीबी ३५० बाइक ४,१२५ युनिट्स आणि जावा येज्दी २,५५३ युनिट्स विक्रीसह अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.