Royal Enfield Classic 650 launched in India: देशातील आघाडीची परफॉर्मन्स बाईक उत्पादक कंपनी रॉयल एनफिल्डने अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांची नवीन बाईक क्लासिक ६५० अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केली आहे. गेल्या वर्षी इटलीतील मिलान येथे झालेल्या २०२४ च्या EICMA मोटर शोमध्ये रॉयल एनफिल्डने त्यांची नवीन मोटरसायकल क्लासिक ६५० जगासमोर सादर केली.

आकर्षक लूक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत ३.३७ लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.

कशी आहे नवीन क्लासिक ६५० (Royal Enfield Classic 650)

लूक आणि डिझाइनच्या बाबतीत ही बाईक तिच्या सिबलिंग मॉडेल क्लासिक ३५० सारखीच आहे. यात जो सगळ्यात मोठा बदल तुम्हाला दिसेल तो म्हणजे त्याचे इंजिन. ही बाईक एका ट्रायल्ड आणि टेस्टेड ६४८ सीसी पॅरलल-ट्विन इंजिनने सुसज्ज आहे, जी ४७ एचपीची शक्तिशाली पॉवर आणि ५२.३ एनएमचा टॉर्क जनरेट करते. रॉयल एनफिल्डच्या इतर ६५० सीसी बाइक्सप्रमाणे यात स्लिप-अँड-असिस्ट क्लचसह ६-स्पीड गिअरबॉक्स आहे.

२४३ किलो वजनासह, क्लासिक ६५० ट्विन हे रॉयल एनफिल्ड लाइनअपमधील सर्वात वजनदार मॉडेल आहे. त्याच्या सीटची उंची ८०० मिमी आहे आणि बाईकचा ग्राउंड क्लीयरन्स १५४ मिमी आहे, जे सर्व प्रकारच्या रस्त्यांच्या परिस्थितीसाठी खूप चांगले आहे.

क्लासिक ६५० चे कलर व्हेरिएंट आणि किंमत (Royal Enfield Classic 650 Variants and Price)

व्हेरिएंटकिंमत
ब्रंटिंगथोर्प ब्लू (Bruntingthorpe Blue)3.37 लाख रुपये
वल्लम रेड (Vallam Red)3.37 लाख रुपये
टील (Teal)3.41 लाख रुपये
ब्लॅक क्रोम (Black Chrome)3.50 लाख रुपये

जरी त्याची डिझाइन क्लासिक ३५० सारखी असली तरी जेव्हा अंडरपीनिंग गोष्टींचा विचार केला जातो तेव्हा ती बऱ्याच प्रमाणात अलीकडेच लाँच झालेल्या शॉटगन ६५० शी जुळते. दोन्ही बाईकमध्ये मुख्य फ्रेम, ब्रेक, ट्विन शॉक अ‍ॅब्झॉर्वर आणि स्विंगआर्म हे सर्व सारखेच आहेत. बदलांमध्ये १९/१८-इंच वायर-स्पोक व्हील्स आणि ४३ मिमी टेलिस्कोपिक फोर्क्सचा समावेश आहे.

फीचर्स

क्लासिक ६५० मध्ये जवळजवळ लहान ३५० सीसी सिबलिंगप्रमाणेच फीचर्स-सेट आहे. यात ट्रिपर नेव्हिगेशन पॉडसह डिजी-अ‍ॅनालॉग डिस्प्ले आहे आणि यूएसबी चार्जरदेखील उपलब्ध आहे. तथापि, या दोन्ही बाईकमधील एक मोठा फरक म्हणजे क्लासिक ६५० मध्ये स्लिप आणि असिस्ट क्लच आहे.

कंपनीने या बाईकमध्ये MRF चे शक्तिशाली नायलोहाय टायर्स वापरले आहेत. तथापि, त्यात शॉटगनप्रमाणेच सस्पेंशन ट्रॅव्हल आहे, ज्यामध्ये समोर १२० मिमी आणि मागील बाजूस ९० मिमी सस्पेंशन आहे.

कलर, बुकिंग आणि डिलिव्हरी

ही बाईक एकूण चार कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये ब्रंटिंगथोर्प ब्लू (३.३७ लाख रुपये), वल्लम रेड (३.३७ लाख रुपये), टील (३.४१ लाख रुपये) आणि ब्लॅक क्रोम (३.५० लाख रुपये) यांचा समावेश आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, नवीन क्लासिक ६५० ची बुकिंग आजपासून सुरू झाली आहे आणि त्याची डिलिव्हरी एप्रिलपासून सुरू होईल. ही बाईक कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपद्वारे बुक केली जाऊ शकते.