Royal Enfield Sales in December 2023: दिग्गज दुचाकी उत्पादक कंपनी Royal Enfield च्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. या बाईकचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यातही प्रामुख्याने कंपनीच्या Royal Enfield Bullet 350 आणि Royal Enfield Classic 350 या दोन बाइक्सना भारतासह जगभरात मोठी मागणी आहे. अशातच रॉयल एनफील्डने डिसेंबर २०२३ साठी आपला विक्री अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून Royal Enfield च्या विक्रीत घसरण झाल्याचे समोर आले आहे.
Royal Enfield ने डिसेंबर २०२३ चे आपल्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ च्या तुलनेत कंपनीने सात टक्क्यांनी कमी विक्री नोंदवली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये, कंपनीने एकूण ६३,३९७ युनिट्सची विक्री केली आहे, ज्यामध्ये परदेशात पाठवलेल्या बाइकचाही समावेश आहे. डिसेंबर २०२२ मध्ये कंपनीने ६८,४०० युनिट्सची विक्री केली होती. जर आपण परदेशातील विक्रीबद्दल बोललो तर कंपनीची कामगिरी आणखी कमकुवत झाली आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये ६,०९६ बाइक्स परदेशात पाठवण्यात आल्या होत्या, तर डिसेंबर २०२२ मध्ये हा आकडा ८,५७९ युनिट्स होता. म्हणजेच कंपनीने निर्यातीत २९ टक्क्यांची घट नोंदवली आहे. तथापि, एप्रिल ते डिसेंबर २०२३ दरम्यान कंपनीची एकूण विक्री ६ लाख ८५ हजार ०५९ युनिट्स होती, जी गेल्या वर्षीच्या याच वेळेपेक्षा ११ टक्क्यांनी अधिक आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२३ दरम्यान, रॉयल एनफिल्डने एकूण ५४,७८६ युनिट्सची निर्यात केली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २६ टक्क्यांनी कमी आहे.
(हे ही वाचा : नाद करायचा नाय! मारुतीच्या कारची छप्परफाड विक्री, ‘या’ SUV ला देशातील बाजारपेठेत मोठी मागणी )
Royal Enfield ने डिसेंबर २०२३ मध्ये ३५०cc श्रेणीतील एकूण ५५ हजार ४०१ युनिट्सची विक्री केली आहे, तर डिसेंबर २०२२ मध्ये ६१ हजार २२३ युनिट्सची विक्री झाली आहे. म्हणजेच, या श्रेणीतील कंपनीची विक्री वार्षिक आधारावर १० टक्क्यांनी कमी आहे. तथापि, एप्रिल ते डिसेंबर २०२३ दरम्यान, Royal Enfield ने या श्रेणीतील एकूण ६ लाख ११ हजार ९४७ युनिट्सची विक्री केली आहे, जी वार्षिक आधारावर १३ टक्क्यांची वाढ आहे कारण त्यांनी एप्रिल ते डिसेंबर २०२२ दरम्यान ५ लाख ४० हजार ५८९ युनिट्सची विक्री केली होती.
नुकतेच Royal Enfield Himalayan 450 लाँच
Royal Enfield ने नोव्हेंबर २०२३ मध्ये हिमालयन 450 साहसी मोटरसायकल लाँच केली. हिमालयन दोन राइडिंग मोडमध्ये उपलब्ध आहे, ज्यात इको आणि स्पोर्ट मोडचा समावेश आहे. रॉयल एनफिल्डच्या या बाईकमध्ये ४५२ cc लिक्विड कूल्ड DOHC सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे ८०००rpm वर ३९.५ hp पॉवर आणि ५५००rpm वर ४०Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. आता नवीन Royal Enfield Himalayan च्या किमती वाढवल्या आहेत. आता बाईकची किंमत २.८५ लाख रुपयांवरून २.९८ लाख रुपये झाली आहे.