नवनवीन फीचर्ससह रॉयल एन्फिल्ड आपल्या क्लासिक बुलेट बाजारात घेऊन येत आहे. अलीकडेच स्क्रॅम ४११, न्यू क्लासिक ३५० सह ७ ऑगस्टला हंटर ३५० ही नवी बुलेट डिझाईन लाँच केली आहे. हंटर ३५० ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात स्वस्त बुलेट आहे. याच बुलेटच्या लाँच कार्यक्रमात रॉयल एन्फिल्डचे CEO सिद्धार्थ लाल यांनी लवकरच बाजारात इलेक्ट्रिक बुलेट घेऊन असल्याचे संकेत दिले आहेत.
पेट्रोल, डिझेलचे वाढते दर पाहता इलेक्ट्रिक वाहने ही ऑटोमोबाईल क्षेत्राचे भविष्य असेल असे अंदाज आजवर अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात सर्वच बड्या कंपन्या नवनवीन मॉडेल आणण्याच्या तयारीत आहेत. अशातच आता रॉयल एन्फिल्डने जर आपली इलेक्ट्रिक बुलेट लाँच केली तर त्याचे फीचर व वेग किती असेल याविषयी जाणून घेऊयात.
सिद्धार्थ लाल त्यांनी सांगितले की ३५०cc – ६५०cc च्या पॉवरच्या इलेक्ट्रिक बुलेट तयार करणे महाग ठरू शकते कारण साधारण २०- ३०bhp पॉवरच्या बॅटरीसाठी तंत्रज्ञान तयार करावे लागणार आहे. तसेच बाहेरून आयात करण्यापेक्षा स्थानिक स्तरावर ही बॅटरी बनवण्याचे काम होणार आहे. रॉयल एनफील्ड इलेक्ट्रिक मॉडल मध्ये एका चार्जिंग मध्ये १०० ते १५० किमी पर्यंत प्रवास करण्याची क्षमता असेल.
Video: सायकल मुळे बे’चैन’ व्हायचे दिवस गेले! Chainless Cycle चे फीचर व किमंत जाणून घ्या
हंटर ३५० लाँच मध्ये रॉयल एनफील्ड EVs च्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली होती. सिद्धार्थ लाल यांनी सांगितले की, रॉयल एन्फिल्डच्या इलेक्ट्रिक वाहनाची डिझाईन तयार केली जात आहे तोपर्यंत कदाचित या क्षेत्रात बदल होतील मात्र कंपनीच्या मते गुणवत्तेला सर्वाधिक प्राधान्य आहे. ग्राहकांची सुरक्षितता व बुलेटचा क्लासिक लुक व दमदार इंजिनसह पूर्ण प्लॅनिंग नंतर लवकरच हि नवी कोरी इलेक्ट्रिक बुलेट लाँच करण्यात येणार आहे.