Car Color Change RTO Rules: आजकाल कार किंवा बाईक खरेदी करणे ही केवळ लोकांची गरज नाही, तर तो एक छंद बनला आहे. त्यात आजकाल लोकांमध्ये कार रॅपिंगचा ट्रेंडही वाढताना दिसतोय. त्यात लोक त्यांच्या जुन्या कारला कंटाळतात. अशा वेळी ते एक तर नवीन कार खरेदी करतात किंवा आहे तीच कार पुन्हा बदल करून वापरतात. यावेळी काही लोक कारचा रंग बदलतात. मात्र, असे करणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण- भारतात कारचा रंग बदलण्याशी संबंधित नियम खूपच कडक आहेत. तुम्ही तुमच्या कारचा रंग बदलल्यास, त्याची प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) येथे नोंदणी करणे कायद्याने आवश्यक आहे.
कायदा काय म्हणतो जाणून घ्या
तुमच्या गाडीचा रंग तुमच्या मनाप्रमाणे बदलणे कायदेशीररीत्या चुकीचे नाही; पण असे करण्यासाठी तुम्हाला काही कायदेशीर प्रक्रियांचे पालन करावे लागते. कारण- वाहनाच्या आरसी बुकमध्ये तुमच्या वाहनाचा रंग नमूद केलेला असतो. अशा वेळी तुम्हाला वाहन कायद्याच्या कलम ५२ अंतर्गत वाहनाचा रंग बदलण्याची प्रक्रिया पार पडावी लागते. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या गाडीचा रंग बदलणार असाल, तर तुम्हाला त्याबाबत आरटीओला कळवावे लागेल आणि गाडीचा रंग बदलण्याचा तपशील आरसी बुकमध्ये द्यावा लागेल. तुम्हाला तुमचे आरसी बुक कलर शेड सॅम्पलसह तुमच्या आरटीओकडे न्यावे लागेल. त्यातही महत्त्वाचे म्हणजे तुम्ही त्याच आरटीओमध्ये जायला हवे, जिथे तुमचे वाहन नोंदणीकृत आहे.
Read More Latest News : पाठीमागून मृत्यू आला अन्…; रस्त्यावरील थरारक अपघात, VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कोणाची?
जर तुम्हाला तुमची कार इतर कोणत्याही रंगात बदलायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला मोटारीची आधीची माहिती आरटीओला दिलेली असायला हवी जेव्हा तुम्ही तुमच्या गाडीचा रंग बदलणार असाल, तेव्हा रंग बदलण्यापूर्वी आरटीओला कळवणे आवश्यक आहे. आरटीओमध्ये रंग बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, तर मग तुम्ही कोणत्याही दुकानात जाऊन गाडीचा रंग बदलू शकता. त्यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये आवश्यक ते शुल्क भरावे लागू शकते.
१) नोंदणीमध्ये बदल : तुम्ही आरटीओला कळवल्यावर तेथील कर्मचारी तुमच्या आरसीमध्ये तुमच्या गाडीच्या रंगात होणाऱ्या बदलाची नोंद करील. त्यानंतर तुम्हाला नवीन आरसी बुक मिळेल. या प्रक्रियेमुळे तुमच्या गाडीचा नवीन रंग कायदेशीररीत्या ओळखला जाईल.
२) दंड : जर तुम्ही आरटीओला न कळवता गाडीचा रंग बदलला आणि पोलिस तपासणीत तुम्ही पकडला गेलात, तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये असेदेखील होऊ शकते की, तुमची गाडी जप्त केली जाऊ शकते.
‘या’ रंगांना मनाई
राज्याच्या कायद्यानुसार संरक्षणासाठीचा ऑलिव्ह हिरवा, टॅक्सीसाठीचा पिवळा असे काही रंग वापरण्यास परवानगी नाही.
आरटीओमध्ये अशा प्रकारे भरा फॉर्म
१) NAMV फॉर्म भरा : सर्वप्रथम तुम्हाला NAMV फॉर्म इंटरनेटवरून डाउनलोड करून किंवा RTO वरून मिळवून तो भरावा लागेल. हा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही आरटीओ अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकता.
२) आरटीओमध्ये फॉर्म जमा करा : आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या संबंधित आरटीओ कार्यालयात जा. तेथे फॉर्म जमा करा आणि सेवा शुल्कदेखील भरा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आरटीओच्या परवानगीची प्रतीक्षा करावी लागेल.
३) तुम्हाला पुन्हा आरटीओमध्ये जावे लागेल : कारचा रंग बदलल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा आरटीओमध्ये जावे लागेल. यावेळी आपल्या वाहनाचे आरसी बुकदेखील सोबत घ्या. कारण- त्यात आवश्यक ते बदल केले जातील.
४) विमा कंपनी : तुम्ही तुमच्या गाडीचा रंग बदलला आहे, याविषयीची माहिती तुमच्या विमा कंपनीला देण्यास विसरू नका. जर तुम्ही कारच्या बदललेल्या रंगाची माहिती विमा कंपनीला देण्यास विसरलात, तर तुमच्यावर दंडही आकारला जाऊ शकतो.