Driving Tips: कधीही कोणतीही गाडी चालवताना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे हायवे रोडवर याची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी. कारण हायवेवर अनेक जण मोठा आणि रिकामा रस्ता पाहिल्यावर खूप वेगाने गाडी चालवतात आणि हेच मोठ्या अपघातांचे कारण बनते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गाडी चालवताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, याबाबात महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.
हायवेवर गाडी चालवताना अशी घ्या काळजी
प्री-ड्राइव्ह तपासणी करा
तुमच्या गाडीचे टायर योग्य भरले आहेत की नाही याची खात्री करा. तुमची कागदपत्रे गाडीत ठेवा आणि आवश्यक असल्यास पाणी, टॉर्चलाइट, पोर्टेबल चार्जर या गोष्टीदेखील तुमच्याबरोबर ठेवा.
स्थिर गती राखा
जेव्हा तुम्ही हायवेवर गाडी चालवता, तेव्हा तुमच्या गाडीचा वेग वारंवार बदलणे टाळा आणि तुमच्या सोयीनुसार एकाच वेगात गाडी चालवा. जेणेकरून गाडी नेहमी तुमच्या नियंत्रणात राहील आणि तुम्ही अपघातापासून सुरक्षित राहू शकाल.
सतत लेन बदलू नका
हायवेवर वारंवार लेन बदलल्याने तुमच्यासह इतर वाहनांचादेखील अपघात होण्याचा धोका असतो, म्हणून एकच लेन निवडा आणि अत्यंत गरज असल्याशिवाय लेन बदलू नका.
इतर वाहनांपासून अंतर ठेवा
केवळ हायवेवरच नाही तर प्रत्येक रस्त्यावर तुम्ही समोरच्या वाहनापासून योग्य अंतर राखले पाहिजे, जेणेकरून समोरच्या गाडीने ब्रेक लावल्यास तुम्हाला सावरण्याची संधी मिळेल आणि तुमची गाडी योग्य वेळी थांबू शकेल.
अशाप्रकारे ओव्हरटेक करा
हायवेवर किंवा इतर कोणत्याही रस्त्यावर वाहनाला ओव्हरटेक करताना मागून दुसरे वाहन वेगाने येत आहे की नाही याकडे लक्ष द्या. कारण ओव्हरटेक करताना लोक अनेकदा ही चूक करतात.
गाडीच्या साइड मिररकडे लक्ष द्या
गाडी चालवताना, साइड मिरर आणि बॅक मिररवर सतत लक्ष ठेवत राहा, यामुळे इतर वाहनांसह अपघात टाळता येऊ शकतात.
हेही वाचा: बाईकचालकांनी ‘या’ महत्त्वाच्या नियमांचे पालन केल्यास बाईक दीर्घकाळ राहील व्यवस्थित
विश्रांती घ्या
हायवेवर लांबच्या प्रवासात सतत गाडी चालवल्याने थकवा येतो आणि यामुळे बऱ्याचदा डुलकी लागण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही लांब अंतरासाठी गाडी चालवत असाल तेव्हा थोड्या अंतराने ब्रेक घेत राहा आणि विश्रांती घ्या.