पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाबाबत वाढलेली जागरूकता यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढली आहे. जर तुम्ही अधिक कार्यक्षम आणि स्टायलिश दिसणारी इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल तर ओला S1 प्रो, बजाज चेतक इलेक्ट्रिक, टीव्हीएस iQube आणि नुकत्याच लॉन्च केलेल्या Jaunty Plus या चार सर्वात उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया या चार इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल…
टीव्हीएस iQube
टीव्हीएसच्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १ लाख १५ हजार रुपये आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये ७५ किमीपर्यंतची रेंज देते. त्याचवेळी, ही स्कूटर केवळ ४.२ सेकंदात ० ते ४० किमीचा वेग पकडू शकते आणि तिचा टॉप स्पीड ७८ किमी प्रतितास आहे. तर ही iQube इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्यासाठी तुम्हाला ५ तास वेळ लागेल.तसेच या स्कूटरच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला जिओ-फेन्सिंग आणि जिओ टॅगिंग सारखे फीचर्स यात मिळतील. iQube वरील हेडलॅम्प पुढील ऍप्रनमध्ये लावण्यात आला आहे आणि LED डेटाइम रनिंग लाइट देण्यात आली आहे.
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर
बजाजने चेतक इलेक्ट्रिक स्कूटर ही अर्बन आणि प्रीमियम या दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. त्यांची एक्स-शोरूम किंमत १ लाख तसेच दुसर्या स्कूटरची किंमत १ लाख १५ हजार रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची डिझाईन रेट्रो स्टाइलमध्ये करण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्हाला राउंड हेडलॅम्प आणि LED डेटाइम रनिंग लाइट मिळेल जो क्रोम बेझल सह येतो. दुसरीकडे त्याच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर, एका चार्जमध्ये ९० किमी पर्यंत चालवता येते आणि चार्ज होण्यासाठी ५ तास लागतात.
ओला एस१ प्रो इलेक्ट्रिक स्कूटर
ओलाच्या एस१ प्रो या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १,२९,९९९ रुपये इतकी आहे. या स्कूटरमध्ये तुम्हाला ३.९७ kW ची बॅटरी मिळते, जी एका चार्जमध्ये १८१ किमीची रेंज देते. त्याचबरोबर तुम्ही ही स्कूटर १८ मिनिटे चार्ज केल्यानंतर ७५ किमी पर्यंत चालवू शकता. ओला एस१ प्रो ही इलेक्ट्रिक स्कूटर ४ तास ४८ मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकते. या स्कूटरमध्ये, कंपनीने ७ -इंचाची मोठी टचस्क्रीन, नेव्हिगेशन सिस्टम, ओटीए अपडेट, ४G कनेक्टिव्हिटी, रिव्हर्स मोड, हिल होल्ड असिस्ट, क्रूझ कंट्रोल, प्रॉक्सिमिटी अनलॉक, साइड स्टँड अलर्ट, टेम्पर अलर्ट यांसारखी हाय-टेक वैशिष्ट्ये दिली आहेत. आणि ब्लूटूथ. कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे.
जाँटी प्लस (Jaunty Plus) ई-स्कूटर
या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १ लाख १० हजार ४६० रुपये आहे. Jaunty Plus ई-स्कूटरमध्ये ६०V/४०Ah बॅटरी आहे जी स्कूटरला एका चार्जवर १२० किमी पर्यंतची रेंज देते आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात. Jaunty Plus मध्ये हाय-परफॉर्मन्स मोटर, क्रूझ कंट्रोल स्विच, इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टम (EABS) आणि अँटी-थेफ्ट अलार्म सारखी वैशिष्ट्ये आहेत.