Avoid Car Brake Fail: गाडी चालवताना अचानक ब्रेक फेल होणे हे प्रत्येक चालकासाठी मोठे संकट आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे गाडीचा भीषण अपघात होण्याची दाट शक्यता असते. अशी अनेक प्रकरणे आपण टीव्ही, चित्रपटांमध्ये पाहिली आहेत. अशा घटनांमध्ये अनेकदा त्या गाडीतील लोकांनाच नव्हे, तर रस्त्यावरील अनेकांनाही आपला जीवदेखील गमवावा लागतो. वाहन जास्त वेगाने जात असताना जर असा प्रसंग कधी तुमच्यावर ओढवला, तर गाडी सुरक्षितपणे थांबवण्यासाठी तुम्हाला ‘या’ टिप्स माहीत असायला हव्यात.
गाडीचा ब्रेक फेल झाल्यावर काय कराल?
मन स्थिर ठेवा
गाडी चालवताना अशी परिस्थिती तुमच्यावर ओढवली, तर तुम्ही तुमचे मन स्थिर आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे हे जास्त महत्त्वाचे आहे. कारण- अशा परिस्थितीत मन शांत असेल, तरच तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकता आणि वेळेत आवश्यक ती पावले उचलू शकता. त्यामुळे गाडीचे ब्रेक फेल झाल्यास घाबरून जाण्याऐवजी तुम्ही तुमचे मन स्थिर ठेवा.
अॅक्सिलरेटर सोडा
अचानक ब्रेक फेल झाल्यास तुमचा पाय अॅक्सिलरेटरवरून काढा. असे केल्याने गाडीचा वेग आणखी वाढणार नाही आणि ती सुरक्षितपणे थांबवणे शक्य होईल.
हँडब्रेकचा वापर
आता तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवून, हँडब्रेक वापरावा लागेल. परंतु, तुम्ही ही कृती वेगाने करू नये. कारण- त्यामुळे गाडी घसरू शकते. म्हणून तुमच्या गाडीचा हँडब्रेक खूप काळजीपूर्वक लावा; जेणेकरून गाडी नियंत्रित पद्धतीने थांबेल.
कमी गियरमध्ये शिफ्ट करा
जेव्हा गाडीचा वेग कमी होतो, तेव्हा तुम्हाला डाउन शिफ्टिंगची प्रक्रिया सुरू करावी लागेल आणि वेगाबरोबर गिअरदेखील कमी करावे लागतील. नाही तर तुम्हाला गाडी योग्यरीत्या थांबवण्यात अडचण येईल.
हॉर्न आणि हेडलाइट्स वापरा
अशा परिस्थितीत येणाऱ्या गाड्यांच्या चालकांना सावध करणे खूपच गरजेचे आहे. रस्त्यावरील इतर गाड्या आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे. तुमच्या गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत हे समोरील वाहनचालकांच्या लक्षात यावे यासाठी जोरात हॉर्न वाजवून आणि हेडलाइट्सचा वापर करून त्यांना संकेत द्या.
इंजिन बंद करू नका
तुम्ही कधीही इंजिन बंद करण्याची चूक करू नका. कारण- त्यामुळे स्टेअरिंग लॉक होऊ शकते आणि तुम्ही अधिक अडचणीत येऊ शकता. म्हणून नेहमी इंजिन चालू ठेवा आणि बाजूच्या डिव्हायडर आणि रेलिंगच्या मदतीने गाडीचा वेग कमी करा.