Suzuki Plans to Launch 6 Electric Cars in India: देशात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वाढू लागली आहे. हेच लक्षात घेता अनेक दिग्गज वाहन निर्माता कंपनी आपले वाहन अपडेट करून इलेक्ट्रिक स्वरूपात बाजारात उतरवत आहे. आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने ऑटो एक्सपोमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार संकल्पना सादर केली, हे आपणा सर्वांना माहीतच आहे, आता कंपनी विविध विभागांसाठी २०३० पर्यंत ६ नवीन इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर येत आहे.
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (मार्केटिंग आणि विक्री) शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, २०३० पर्यंत उत्पादन पोर्टफोलिओमध्ये किमान सहा इलेक्ट्रिक कार समाविष्ट करण्याची योजना आहे. ते पुढे म्हणाले की, या सहा इलेक्ट्रिक कार वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ठेवल्या जातील. विशेष म्हणजे, श्रीवास्तव यांची संकल्पना मारुती सुझुकीने ऑटो एक्सपो २०२३ मध्ये ईव्हीएक्सच्या रूपात आपली पहिली EV संकल्पना उघड केल्यानंतर आली आहे.
२०३० पर्यंत भारतीय रस्त्यांवर धावणार १० लाख इलेक्ट्रिक कार
भारतातील इलेक्ट्रिक कारचा सध्याचा बाजारातील हिस्सा हा एकूण बाजारपेठेच्या एक टक्का आहे. शशांक श्रीवास्तव यांचा विश्वास आहे की, २०२४-२५ मध्ये हे प्रमाण सुमारे तीन टक्क्यांपर्यंत वाढेल आणि २०२३ मध्ये ते सुमारे १७ टक्क्यांपर्यंत वाढेल. ते म्हणाले की, २०३० पर्यंत भारतीय रस्त्यावर सुमारे १० लाख इलेक्ट्रिक कार असतील.
(हे ही वाचा : भारीच..! जगातील पहिली सोडियम-आयन बॅटरीची इलेक्ट्रिक कार आली, रेंज पाहून तुम्हीही व्हाल थक्क )
बॅटरीची किंमत कमी करण्यावर कंपनीचा भर
श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या सामान्य कारची किंमत १०० असेल तर बॅटरीच्या उच्च किंमतीमुळे EV ची किंमत १६० आहे. मारुती सुझुकी बॅटरीची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
कंपनी स्टेटमेंट
कंपनीने म्हटले आहे की, ऑटो एक्सपो २०२३ मध्ये घोषित केल्यानुसार आम्ही FY२०२४ मध्ये SUV बॅटरी EV भारतात सादर करू. २०३० पर्यंत सहा मॉडेल लाँच केले जातील. कंपनीने म्हटले आहे की, FY २०३० पर्यंत, बॅटरी ईव्हीचा एकूण पोर्टफोलिओमध्ये १५ टक्के वाटा असेल, तर ICE वाहनांचा वाटा ६० टक्के असेल आणि हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा २५ टक्के असेल, असे कंपनीने नमूद केले आहे.