Car Care Tips: उन्हाळा सुरू झाला असून या दिवसात तुमच्या कारला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. रस्त्यावरील तीव्र सूर्यप्रकाश, उच्च तापमान आणि उष्णता यामुळे वाहनाचे इंजिन, बॅटरी, टायर आणि इतर भागांचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच उन्हाळ्यात तुमच्या गाडीची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्यात कारची घ्या विशेष काळजी
इंजिन कूलिंग सिस्टम तपासा
उन्हाळ्यात कारचे इंजिन लवकर गरम होऊ शकते, त्यामुळे जास्त गरम होण्याची समस्या उद्भवू शकते. हे टाळण्यासाठी रेडिएटरमध्ये पुरेशी कुलेंट पातळी राखा. जर कुलेंट जुना असेल तर तो बदला. याशिवाय रेडिएटरमध्ये गळती आणि अडथळे आहेत का ते तपासणे खूप महत्त्वाचे आहे.
टायरचे प्रेशर योग्य ठेवा
उन्हाळ्यात रस्त्यांचे तापमान वाढते, त्यामुळे टायर प्रेशर वाढू शकते आणि अशा परिस्थितीत टायर फुटण्याचा धोकादेखील वाढतो. ही समस्या टाळण्यासाठी, टायरचा दाब नियमितपणे तपासा आणि कंपनीने ठरवलेल्या स्टँडर्डनुसार ठेवा. याशिवाय, टायर्सची पकड रस्त्यावर टिकून राहावी म्हणून त्यांचे ट्रेड आणि जीर्णता तपासत राहा. तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एक अतिरिक्त टायर (स्टेपनी) बरोबर ठेवा.
बॅटरीची काळजी
उन्हाळ्यात कारच्या बॅटरीवर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे ती लवकर खराब होऊ शकते. बॅटरीच्या वायर्स आणि टर्मिनल्स स्वच्छ करा, जेणेकरून त्यांना गंज लागणार नाही. तसेच बॅटरीमधील डिस्टिल्ड वॉटर लेव्हल तपासा आणि जर बॅटरी खूप जुनी असेल तर ती बदलण्याचा विचार करा.
इंजिन ऑइल आणि ब्रेक फ्लुइड तपासा
उन्हाळ्यात इंजिन ऑइल पातळ होऊ शकते, म्हणून त्याची पातळी आणि गुणवत्ता तपासत रहा. इंजिनच्या चांगल्या कामगिरीसाठी योग्य ग्रेडचे इंजिन ऑइल वापरा. ब्रेक फ्लुइड आणि क्लच फ्लुइड वेळोवेळी तपासणे आणि गरज पडल्यास ते बदलणेदेखील महत्त्वाचे आहे.
गाडीचा एअर कंडिशनर (एसी) चांगल्या स्थितीत ठेवा
उन्हाळ्यात एसीची सर्वात जास्त गरज असते, म्हणून त्याची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. जर एसीमधून थंड हवा येत नसेल तर रेफ्रिजरंट पुन्हा भरून घ्या. तसेच, गरज पडल्यास एसी फिल्टर स्वच्छ करा किंवा बदला. तसेच ब्लोअर मोटर आणि कॉम्प्रेसर तपासा.
सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा
थेट सूर्यप्रकाशात गाडी पार्क करणे टाळा, कारण त्यामुळे आतील भाग आणि रंग खराब होऊ शकतो. गाडीमध्ये विंडशील्ड सनशेड वापरा. जेव्हा गाडी उन्हात पार्क केली जाते तेव्हा खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात, जेणेकरून हवा आत येऊ शकेल.