टाटा मोटर्स ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी टाटा मोटर्स नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. भारतीय बाजारामध्ये सध्या टाटाची Nexon एसयूव्ही फारच लोकप्रिय होताना दिसत आहे. टाटा मोटर्सने नुकतेच आपल्या एसयूव्ही नेक्साॅनचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. आता १७ ऑक्टोबर रोजी टाटा मोटर्स आपल्या आणखी २ कार्स लॉन्च करण्याची तयारी करत आहे. टाटा कंपनी लवकरच आपली हॅरिअर आणि सफारी फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी या दोन्ही मॉडेल्सचे अनावरण केले होते.
नवीन हॅरिअर आणि सफारीच्या डिझाईनमध्ये टाटा मोटर्सने काही महत्वाचे बदल केले आहेत. टाटाच्या दोन्ही फेसलिफ्ट मॉडेलमध्ये नवीन ग्रील, नव्याने डिझाइन केलेले हेडलाइट, तसेच नवीन एलईडी डीआरएल आणि अपडेटेड टेल लॅम्प देण्यात आले आहेत. या दोन्ही मॉडेल्सचे बुकिंग सुरु झाले आहे. खरेदीदार २५ हजारांमध्ये टोकन किंमत देऊन टाटा हॅरिअर आणि सफारीचे बुकिंग करू शकता. या महिन्याच्या शेवटी या दोन्ही मॉडेल्सची डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
टाटाच्या नवीन हॅरिअर आणि सफारी मॉडेलच्या इंटेरिअरबद्दल बोलायचे झाल्यास या दोन्ही मॉडेल्समधील स्टीअरिंग व्हीलवर टाटाचा लोगो, नवीन हॅरिअर आणि सफारी मॉडेलमध्ये फिजिकल बटणाऐवजी टच कंट्रोल, जेबीएलचे स्पिकर्स, तसेच १२.३ इंचाचा इंफोटेन्मेन्ट सिस्टीम , व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग मिळणार आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये टाटा मोटर्स नेहमीप्रमाणेच सेफ्टी फीचर्स देणार आहे. यामध्ये ग्राहकांना अनेक एअरबॅग्स, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूज कंट्रोल, ESP, डोज ऑफ अलर्ट, ISOFIX सीट, हिल डिसेंट कंट्रोल, इमर्जन्सी कॉल, ब्रेकडाऊन अलर्ट यांसारखे स्टॅंडर्ड सेफ्टी फीचर्स मिळणार आहे. तसेच नवीन हॅरिअर आणि सफारीमध्ये ADAS हे महत्वाचे फिचर देखील मिळणार आहे.
नवीन टाटा हॅरिअर आणि सफारी फेसलिफ्टच्या किंमतीबद्दल कंपनीने अजून खुलासा केलेला नाही. टाटा मोटर्सकडून १७ ऑक्टोबर रोजी या दोन्ही मॉडेल्सच्या किंमतीबद्दल खुलासा केला जाईल. सध्या उपलब्ध असलेल्या मॉडेल्सच्या तुलनेत टाटा हॅरिअर आणि सफारी फेसलिफ्ट हे महाग असण्याची शक्यता आहे. टाटाची नवीन हॅरिअर आणि सफारी फेसलिफ्ट बद्दल अधिक माहिती लॉन्चिंगच्या दिवशीच समोर येईल.