टाटा मोटर्सने आपल्या पॅसेंजर गाड्यांचे दर वाढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मंगळवारी कंपनीद्वारे ही माहिती देण्यात आली. १९ जानेवारीपासून सरासरी ०.९ टक्क्यांनी या किंमती वाढवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. गेल्याच आठवड्यात मारुती सुझुकी इंडियाने त्यांच्या विविध मॉडेल्सच्या किमती तात्काळ प्रभावाने ४.३ टक्क्यांनी वाढवल्या होत्या. मारुती कंपनीच्या निर्णयानंतर आता टाटा मोटर्सने हा निर्णय घेतला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १९ जानेवारी २०२२ पासून सरासरी ०.९% वाढ लागू केली जाईल, जी वाहनाच्या प्रकारावर आणि मॉडेलवर आधारित असेल. तथापि, ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता कंपनीने विशिष्ट प्रकारच्या गाड्यांच्या किमतीत १० हजार रुपयांपर्यंत कपात केली आहे.

सामान्य कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करणे शक्य? जाणून घ्या किती येईल खर्च

किंमत वाढवण्यामागचं कारण

खर्चात झालेल्या वाढीची अंशतः भरपाई करण्यासाठी ही वाढ करण्यात आली असल्याचं कारण कंपनीकडून देण्यात आलं आहे. कंपनी वाढलेल्या किमतीचा एक महत्त्वाचा भाग स्वतःहून समायोजित करत आहे, परंतु एकूण खर्चात झालेल्या तीव्र वाढीमुळे किमतीत कमीत कमी वाढ करून काही बोजा ग्राहकांवर टाकावा लागणार असल्याचं असे कंपनीने पुढे सांगितले.

जुन्या बुकिंगवर होणार नाही परिणाम

या दरवाढीचा १८ जानेवारी २०२२ किंवा त्याआधी बुक केलेल्या गाड्यांच्या किमतींवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कंपनीने सांगितलं आहे. मुंबईतील ही वाहन उत्पादक कंपनी देशांतर्गत बाजारात टियागो, पंच आणि हॅरियर सारख्या विविध मॉडेल्सची विक्री करते.

या निर्णयाबाबत बाकी कंपन्यांचं मत

गेल्या वर्षीच्या तुलनेत पोलाद, अ‍ॅल्युमिनिअम, तांबे, प्लास्टिक आणि इतर महत्त्वाचे धातू महाग झाल्यामुळे गाड्यांच्या किंमती वाढवाव्या लागत असल्याचं इतर ऑटोमोबाईल उत्पादकांचे म्हणणे आहे.

जुने वाहन विकल्यावर तात्काळ बंद करा तुमचं फास्टॅग अकाउंट; अन्यथा बसू शकतो मोठा फटका

मारुतीने ‘या’ गाड्यांच्या किमतीत केली वाढ

नुकतेच मारुतीने डिझायरवर १० हजार, ऑल्टोवर १२,३००, एस-प्रेसवर १२,५००, विटारा ब्रीझावर १४ हजार, स्विफ्टवर १५ हजार, सेलेरिओवर १६ हजार, एर्टिगावर २१,१००, इकोवर २७,००० आणि वॅगन आरवर ३० हजार रुपयांपर्यंत (एक्स शो रुम किंमत) वाढ केली आहे. नेक्सा मॉडल्सच्या एस-क्रॉसवर २१ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आलीय.