जगभरात एसयूव्ही कारचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये भारतामध्येही एसयूव्ही कारला ग्राहकांची पसंती मिळतेय. या कारच्या मागणीतही प्रचंड वाढ झाली आहे. अर्थात मागणीत वाढ झाली म्हणजेच विक्रीतही वाढ झालीच. या वर्षी सणासुदीच्या हंगामात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीच्या यादीत टाटा नेक्सॉनने अव्वल स्थान पटकावले आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये विकल्या गेलेल्या १०,०९६ युनिट्सच्या तुलनेत टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या १३,७६७ युनिट्सची विक्री केली आहे.
टाटा नेक्सॉनने वर्षभरात विक्रीत ३६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक पर्यायांमध्ये सादर केलेली ही एकमेव एसयूव्ही आहे. एवढेच नाही तर टाटा नेक्सॉन एसयूव्हीची सीएनजी आवृत्ती देखील तयार करत आहे, जी भारतीय रस्त्यांवर अनेक वेळा चाचणी करताना पाहिली गेली आहे. नवीन मॉडेल दोन ICE इंजिनांसह उपलब्ध आहे. एक १.२ एल टर्बो पेट्रोल आणि दुसरे १.५ एल टर्बो-डिझेल. Nexon EV दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये ऑफर केले आहे.
आणखी वाचा : Renault Car Discounts: रेनॉल्टच्या ‘या’ कारवर बम्पर डिस्काऊंट; मिळवा ३५ हजार रुपयांपर्यंतची सूट
ऑक्टोबर २०२२ मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीच्या यादीत ह्युंदाई क्रेटा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ह्युंदाईने क्रेटाच्या ११,८८० युनिट्सची विक्री केली होती, जी गेल्या वर्षी याच महिन्यात ६,४५५ युनिट्सची विक्री झाली होती. ह्युंदाई २०२३ च्या सुरुवातीला देशात नवीन क्रेटा फेसलिफ्ट लाँच करेल. ऑटो एक्सपोमध्ये ते प्रदर्शित केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये ADAS तंत्रज्ञान, ३६०-डिग्री कॅमेरा आणि अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम मिळण्याची अपेक्षा आहे.
टाटा पंच सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या विक्रीतही वाढ झाली आहे. कंपनीने ऑक्टोबर २०२२ मध्ये पंचच्या १०,९८२ युनिट्सची विक्री केली होती जी गेल्या वर्षी याच महिन्यात ८,४५३ युनिट्सची होती. असेही वृत्त आहे की, २०२३ मध्ये ते इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर केले जाऊ शकते.
गेल्या दोन महिन्यांपासून सेगमेंटच्या शीर्षस्थानी राहिल्यानंतर, मारुती ब्रेझा ऑक्टोबर २०२२ मध्ये चौथ्या स्थानावर घसरला आहे. मागील वर्षी याच महिन्यात ८,०३२ युनिट्सच्या तुलनेत, ब्रेझाने ९,९४१ युनिट्सची विक्री केली, म्हणजे वर्ष-दर-वर्ष, २४ ची विक्री वाढ नोंदवली आहे.