Best Selling SUV Car: ऑटो क्षेत्रातील कारच्या दुनियेत सध्या एसयुव्ही गाड्यांचा बोलबाला आहे. भारतातील कार ग्राहकांमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीला मोठी मागणी दिसून येत आहे. लोक छोट्या हॅचबॅकमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटची वाहने घेण्यास प्राधान्य देत आहेत. कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आपल्या आकर्षक डिझाईन आणि परफॉर्मन्समुळे खूप लोकप्रिय होत आहेत. आता यातच देशातील बाजारपेठेत एका कारनं विक्रीच्या बाबतीत मोठी मजल मारली आहे. देशातील ग्राहक या कारच्या प्रेमात पडले आहेत, चला तर जाणून घेऊया कोणती आहे ही कार…

‘या’ SUV कारची दणक्यात विक्री

टाटा मोटर्स कंपनीची बाजारात जोरदार घोडदौड सुरू आहे. कंपनीच्या एसयूव्हींना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या (आर्थिक वर्ष २५) ५ गाड्यांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत टाटा पंच ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. पंचचे वर्चस्व अजूनही कायम आहे. त्याच वेळी, ह्युंदाई क्रेटा दुसऱ्या स्थानावर असून मारुती ब्रेझा तिसऱ्या स्थानावर आहे.

२०२५ च्या आर्थिक वर्षातील टॉप-५ विक्री होणाऱ्या एसयूव्हीमध्ये, टाटा पंचने १,९६,५७२ गाड्यांची विक्री केली आणि पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळवले. याशिवाय, हुंडई क्रेटा १,९४,८७१ गाड्या विकून दुसऱ्या स्थानावर आणि मारुती ब्रेझा १,८९,१६३ गाड्या विकून तिसऱ्या स्थानावर राहिली. मारुती फ्रॉन्क्सने १,६६,२१६ गाड्यांची विक्री केली आणि ते चौथ्या स्थानावर राहिले तर महिंद्रा स्कॉर्पिओने १,६४,८४२ गाड्यांची विक्री केली असून ते पाचव्या स्थानावर आहे.

टाटा पंच: इंजिन आणि वैशिष्ट्ये

पंचमध्ये १.२-लिटर ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे ७२.५ पीएस पॉवर आणि १०३ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. पंचमध्ये २ एअरबॅग्ज, ABS+EBD, फ्रंट पॉवर विंडो आणि टिल्ट स्टीअरिंग, १५-इंच टायर्स, इंजिन स्टार्ट स्टॉप, ९० अंश उघडणारे दरवाजे, सेंट्रल लॉकिंग (चावीसह) आणि मागील पार्किंग सेन्सर्स यांसारखी वैशिष्ट्ये दिसतात. तसेच कारच्या टॉप मॉडेल्समध्ये ५ स्पीड एएमटीचा पर्याय देखील मिळतो. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनवर १८.९७ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट १८.८२ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देण्यास सक्षम आहे.

क्रॅश चाचण्यांमध्ये पंचला ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. हेच कारण आहे की टाटा पंच कारची भारतात सर्वाधिक विक्री होत आहे. या कारमध्ये ५ जण बसू शकतात. या कारची किंमत ६.२० लाख पासून सुरू होते.