टाटा मोटर्सची गेल्या महिन्यातली बाजारातली कामगिरी संमिश्र ठरली. कंपनीने वार्षिक विक्रीच्या बाबतीत ७ टक्के वाढ नोंदवली आहे. तर मासिक विक्रीच्या बाबतीत टाटाच्या विक्रीत १० टक्के घट झाली आहे. वार्षिक विक्रीचा विचार केला तर कंपनीच्या ७ पैकी ३ गाड्यांची विक्री घटली आहे. ही विक्री २१ ते ३५ टक्क्यांपर्यत घटली आहे. परंतु कंपनीची लोकप्रिय एसयूव्ही नेक्सॉन आणि पंच या दोन गाड्यांच्या विक्रीत जोरदार वाढ झाली आहे. या दोन्ही कार्सच्या विक्रीत अनुक्रमे १३.५० टक्के आणि १६.४४ टक्के इतकी वाढ झाली आहे. परंतु टाटाची एक कार अशी आहे ज्या कारने वार्षिक विक्रीच्या बाबतीत बलाढ्य नेक्सॉन आणि पंचला मागे टाकलं आहे.
नेक्सॉन आणि पंच या दोन कार्स कंपनीचा बाजारातला मोठा आधारस्तंभ बनल्या असल्या तरी एका छोट्या कारच्या विक्रीत जबरदस्त वाढ होऊन ही कारदेखील कंपनीचा नवा आधारस्तंभ बनू लागली आहे. आम्ही सध्या टाटाची सर्वात स्वस्त आणि छोटी कार टियागोबद्दल बोलत आहोत. कारण या कारच्या वार्षिक विक्रीत तब्बल ६६.१२ टक्के वाढ झाली आहे.
टाटा टियागो ही कंपनीची नंबर १ कार
टाटाच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्सची यादी पाहिली तर त्या यादीत टियागो तिसऱ्या क्रमांकावर आहे. असं असलं तरी या कारची वार्षिक विक्री खूप वाढली आहे. ईयरली ग्रोथचा विचार केल्यास ही कंपनीची नंबर १ कार ठरली आहे. या यादीत पंच दुसऱ्या तर नेक्सॉन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टाटा मोटर्सने गेल्या सहा महिन्यात टियागोच्या ४१,७६१ युनिट्सची विक्री केली आहे. म्हणजे सरासरी कंपनी दर महिन्याला या कारच्या ६,९६० युनिट्सची विक्री करते. जानेवारी २०२३ मध्ये या कारच्या सर्वाधिक ९,०३२ युनिट्सची विक्री झाली होती. जानेवारीच्या तुलनेत या कारच्या विक्रीत फेब्रुवारी महिन्यात घट झाली आहे.
हे ही वाचा >> दोन बायका, कोर्टाचा अजब निर्णय ऐका…! मध्य प्रदेशमधल्या न्यायालयाने सोडवलं दोन बायकांचं भांडण
वार्षिक विक्रीच्या बाबतीत टाटा मोटर्सच्या टॉप ३ कार्स
(कारचे नाव – फेब्रुवारी २०२३ मधील विक्री – फेब्रुवारी २०२२ मधील विक्री – वार्षिक वाढ)
टाटा टियागो – ७,४५७ युनिट्स – ४,४८९ युनिट्स – ६६.१२ टक्के
टाटा पंच – ११,१६९ युनिट्स – ९,५९२ युनिट्स – १६.४४ टक्के
टाटा नेक्सॉन – १३,९१४ युनिट्स – १२,२५९ युनिट्स – १३.५० टक्के