Tata Motors देशातील एक आघाडीची आणि लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. टाटा मोटर्स कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल ज्यामध्ये आधुनिक फीचर्स असतील नवनवीन मॉडेल लॉन्च करत असते. टाटा मोटर्सने आपल्या काही EV कार्स देखील बाजारामध्ये सादर केल्या आहेत. यंदा झालेल्या IPL मध्ये टाटा मोटर्सची Tiago EV कंपनीकडून अधिकृत भागीदार म्हणून या लीगमध्ये सहभागी झाली होती. टाटा मोटर्समधील ग्राहकांच्या आवडत्या टाटा Tiago या हॅचबॅक कारने एक विक्रम केला आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.
ग्राहकांच्या आवडत्या टाटा टियागो या हॅचबॅक कारने ५ लाख युनिट्सचा टप्पा गाठला आहे. म्हणजे आतापर्यंत या कारच्या ५ लाख युनिट्सची विक्री झाली आहे. टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, शेवटच्या १० हजार युनिट्सची विक्री केवळ १५ महिन्यांमध्ये झाली आहे. टियागो हॅचबॅक कार पेट्रोल,सीएनजी आणि इलेक्ट्रिकसह अनेक पॉवरट्रेन पर्यायांमध्ये येते. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.
हेही वाचा : VIDEO: किंमत जाहीर करण्याआधीच तब्बल ६,२०० ग्राहकांनी बुक केली ‘ही’ Maruti कार, जाणून घ्या काय आहे खास?
टियागो हॅचबॅकमध्ये १.२ लिटरचे ३ सिलेंडर असलेले पेट्रोल इंजिन आहे. जे ८६ PS पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करते. ट्रान्स्मिशनसाठी ५-स्पीड MT आणि ५-स्पीड AMT जोडण्यात आलेआहे. सीएनजी व्हेरिएंटमध्ये ५-स्पीड MT सह ७३ PS आणि ९५ एनएम टॉर्क जनरेट करते. टियागो ईव्ही ६१ PS पॉवर आणि ११० एनएम टॉर्क जनरेट करते. इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये दोन बॅटरी पर्याय मिळतात. त्यामध्ये १९.२ KWh लिथियम आयन आणि २४ KWh लिथियम आयन युनिट. टियागो ईव्हीचे मायलेज ३१५ किमी इतके आहे.
टाटा टियागोच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ८.६९ लाख ते १२.०४ लाख (एक्सशोरूम) रुपयांपर्यंत जाते. तर CNG व्हेरिएंटची किंमत ६.५० लाख ते ८. ०१ लाख (एक्सशोरूम ) रुपयांपर्यंत जाते. तर टियागो ईव्ही मॉडेलची किंमत ८.६९ लाखांपासून सुरू होते ती १२.०४ लाख (एक्सशोरूम) रुपयांपर्यंत जाते.
टाटा टियागो खरेदी करणाऱ्यांचे सरासरी वय हे ३५ वर्षे इतके आहे. त्यात ६० टक्के विक्री शहरी भागातून आणि उर्वरित ४० टक्के विक्री ही ग्रामीण भागातून झाली आहे. टियागोने ५ लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा पार पडला आहे. टियागोच्या खरेदीमध्ये महिलांचा वाटा हा १० टक्के इतका आहे.