भारतात गेल्या काही दिवसात एक एक करत अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक आल्या आहेत. मात्र अजून टेस्ला कंपनीच्या गाडीबाबतची उत्सुकता कायम आहे. भारतीय बाजारात टेस्ला कधी येणार? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. आता अमेरिकन ऑटोमेकर कंपनीने भारतात आपले पाय रोवण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. यापूर्वी भारतीय रस्त्यांवर टेस्ला मॉडेल ३ चे फोटो लीक झाले होते. त्याचबरोबर व्हिडिओही समोर आला होता. नुकताच एक फोटो ट्वीटर व्हायरल होत आहे. यात टेस्ला कंपनी भारतात गाड्या चार्ज करण्यासाठी जाळं विणत असल्याचं दिसत आहे. ‘टेस्ला क्लब इंडिया’ने ट्विटरवर एक फोटो अपलोड केला आहे. यात भारतात इन्स्टॉल केलेले काही सुपर चार्जर दिसत आहेत.

टेस्लाचे सुपरचार्जर युनिट्सला V2 १५० kW स्टेशन्स मानलं जातं. यात चार्जिंगसाठ, Type 2 आणि CCS2 असे दोन प्लग मिळतात. या दोन चार्जिंग प्लगपैकी फक्त एकच ऑपरेट केला जाऊ शकतो. टेस्लाचे हे हाय पॉवर सुपरचार्जर्स टेस्ला वाहन केवळ ३० मिनिटांत ५ ते ८० टक्के चार्ज करू शकतात. टेस्ला हे सुपरचार्जर्स आणि त्याची डीलरशिप नवी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई येथे स्थापन करण्यासाठी चाचणी करत आहे. देशातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत या तीन शहरांमध्ये आधीच विकसित चार्जिंग पायाभूत सुविधा आहेत.

एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीनं यापूर्वीच इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्कात सूट मिळवण्याचा प्रयत्न केला होता. आयात शुल्क कमी करण्यासाठी भारत सरकारशी बोलणी सुरु आहेत. आयात शुल्क कमी झाल्यास वाहनांना योग्य किंमत मिळू शकेल. टेस्ला मॉडेल ३ आणि मॉडेल Y सह भारतात उतरण्याची शक्यता आहे.

Story img Loader