Car Battery Life: जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची प्रचंड मागणी आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे देशभरातील लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे पर्याय म्हणून पाहात आहेत. देशात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. ‘टेस्ला ते टाटा’ पर्यंतच्या कंपन्या सतत त्यांच्या ‘इलेक्ट्रिक कार’ चे नवीन मॉडेल लॉंच करण्याच्या तयारीत असतात. इलेक्ट्रिक कार केवळ इंधन वाचवण्याचा एक उत्तम पर्याय नाही तर पर्यावरणासाठी एक उत्तम उपाय आहे. पण तुम्हाला माहितेयं का, या इलेक्ट्रिक कारची बॅटरी किती काळ टिकते? तुमच्याही मनात हाच प्रश्न असेलच, चला तर मग जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर…
लिथियम आयन बॅटरीचा वापर
लिथियम-आयन बॅटरी सध्या आधुनिक इलेक्ट्रिक कारमध्ये वापरल्या जात आहेत. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅब्लेट यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समध्ये या त्याच बॅटरी वापरल्या जातात. बॅटरीची क्षमता कारनुसार बदलते आणि ती चार्ज होण्यासाठी लागणारा वेळ ठरवते.
(हे ही वाचा : कारचे टायर फुटल्याने होताहेत अपघात; टायरची ‘अशी’ घ्या काळजी, तुमचा जीव राहील सुरक्षित )
कारची बॅटरी किती काळ टिकेल?
विविध कार कंपन्यांकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे तयार केलेल्या अहवालानुसार, सर्वसाधारणपणे, इलेक्ट्रिक कारची बॅटरी किमान आठ वर्षे किंवा सुमारे १,५०,००० किलोमीटरपर्यंत टिकू शकते, ज्याला खूप चांगले आयुष्य म्हणता येईल.
ईव्हीची बॅटरी दीर्घकाळ टिकेल अशी रचना आहे. परंतु एका अभ्यास अहवालानुसार कारच्या लिथियम-आयन बॅटरीची क्षमता दरवर्षी सुमारे २.३ टक्क्यांनी कमी होते, जी सामान्य आहे. भारत सरकारने ऑटोमोबाईल उत्पादकांना त्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीवर आठ वर्षे किंवा १,५०,००० किमी, यापैकी जे आधी असेल ते गॅरंटी देणे अनिवार्य केले आहे. अशा प्रकारे, सर्वसाधारणपणे, इलेक्ट्रिक कारची बॅटरी १० वर्षे टिकू शकते आणि १० वर्षांच्या वापरानंतर, बहुतेक ग्राहक त्यांची वाहने बदलण्यास प्राधान्य देतात.