Clutch plate failure: गाडीच्या क्लच प्लेटबाबत अनेक तक्रारी निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. बऱ्याचदा चालकाच्या चुकांमुळे गाडीची क्लच प्लेट खराब होते. पण, गाडी चालवताना क्लच प्लेट लवकरच खराब होणार आहे हे कसे ओळखावे? क्लच प्लेटवर होणारा अनावश्यक खर्च टाळता यावा म्हणून खालील टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा.
क्लच प्लेट खराब होणार असल्याचे तीन संकेत
पिकअप घेताना समस्या
गाडीची क्लच प्लेट खराब होण्यापूर्वी अनेक समस्या जाणवतात. जर तुम्हाला गिअर्स बदलताना कमी पिकअप मिळत असेल, तर तो क्लच प्लेट खराब होत असल्याचे संकेत आहे. जर तुमच्या गाडीबरोबर असे घडत असेल, तर गाडीच्या सर्व्हिसिंगदरम्यान ते तपासा.
धक्का बसल्यासारखे वाटणे
जर क्लच प्लेट खराब झाली, तर गाडी सुरळीत चालू शकत नाही. जेव्हा गाडीची क्लच प्लेट खराब होणार असते आणि त्यावेळी तुम्ही तिसरा किंवा चौथा गिअर लावत असता व गिअर सहजतेने बदलत नाही, तेव्हा समजून जा की, क्लच प्लेटमध्ये समस्या आहे.
चढाईत अडचण येणे
जर तुम्हाला तुमची गाडी उंचवट्यावर चढवताना काही समस्या येत असतील, तर ते गाडीची क्लच प्लेट खराब होणार असल्याचे लक्षण आहे.
चालकांकडून होणाऱ्या चुका कोणत्या?
अनेक जण गाडी टॉप गियरमध्ये चालवण्यासाठी पटकन गिअर्स बदलतात. त्यामुळे केवळ वाहनाच्या इंजिनावरच दबाव पडत नाही, तर क्लच प्लेटवरही परिणाम होतो. म्हणून जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा गिअर्स काळजीपूर्वक बदला.
अनेकांना गाडीच्या क्लच प्लेटवर पाय ठेवून गाडी चालवण्याची सवय असते. हे अनेकदा नवीन ड्रायव्हर्स करतात. जर तुम्हीही असे करत असाल, तर त्यामुळे क्लच प्लेट सातत्याने खराब होते आणि त्याचे आयुष्यदेखील कमी होत जाते.