आजकाल लहान मुलांनाही इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कूटरची खूप आवड आहे. हे पाहता देशातील अनेक कंपन्या ८ ते १० वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर देत आहेत. आता यामध्ये आघाडीची दुचाकी कंपनी कावासाकीने त्यांची पहिली इलेक्ट्रिक दुचाकी इलेक्ट्रोड सादर केली आहे. जी ३ ते ८ वर्षांपर्यंतच्या मुलांना वापरता येऊ शकते . तर जाणून घेऊया आम्ही कावासाकी इलेक्ट्रोडची किंमत, रेंज आणि टॉप स्पीडची संपूर्ण माहिती.
४५ किलो वजन उचलण्यास सक्षम
कावासाकी कंपनीने माहिती दिली आहे की , इलेक्ट्रोड बाईक ४५ किलोपर्यंत वजन उचलू शकते. इलेक्ट्रोडची फ्रेम ॲल्युमिनियमपासून बनलेली आहे आणि त्यात १६ इंच कास्ट ॲल्युमिनियमची चाके आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना लक्षात घेऊन , कंपनीने हँडलबार आणि सीट ॲडजस्टेबल पर्यायासोबत ही बाईक सादर केली आहे.
पालक ठेवू शकतील वेगावर नियंत्रण
लहान मुलांची बाईक असूनही, कावासाकीने या इलेक्ट्रिक बॅलन्स बाईकमध्ये तीन रायडिंग मोड दिले आहेत, ज्यात कमी, मध्यम आणि उच्च कॅपिंग टॉप स्पीडचा समावेश आहे. या तिन्ही मोडमध्ये अनुक्रमे ८ केपीएच, १२ केपीएच आणि २० केपीएचचा स्पीड उपलब्ध असेल. याशिवाय, रायडर मोडमध्ये टॉगल करण्यासाठी, तुम्हाला पासकोड प्रविष्ट करावा लागेल,जेणेकरून पालक त्याचा वेग ठरवू शकतील.
कावासाकी इलेक्ट्रोडची बॅटरी
कावासाकी बाईकची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी अडीच तास लागतात, असा दावा कंपनीने केला आहे. त्याच वेळी, या बाइकमध्ये ३६व्ही ५.१एएच ची लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. तसंच कंपनीकडून फास्ट-चार्जिंग पर्यायाबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.