Top Tips for Buying a New Car and Mistakes to Avoid : भारतात सणासुदीचा काळात लोक आवडीने नवीन गाडीची खरेदी करतात. आता गणेशोत्सवातही तुमच्यापैकी काहींनी नवीन कार विकत घेतली असेल किंवा काहींचा विचार सुरू असेल. जर तुमच्यापैकी कोणी पहिल्यांदाच कार खरेदी करणार असतील आणि त्यांच्या कुटुंबातील ही पहिली कार असेल, तर काही गोष्टी त्यांनी लक्षात घेणे फार गरजेचे आहे. कारण- सणासुदीच्या काळात अनेक वेळा डीलर्स सदोष (डिफेक्टिव्ह) कार लोकांना विकतात. परिणामी नंतर त्या गाडीच्या दुरुस्तीसाठी ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. जर तुम्हीही नवीन कार बुक केली असेल आणि डिलिव्हरीची वाट पाहत असाल, तर गाडीची डिलिव्हरी घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्या.
कार खरेदी करण्यापूर्वी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तसेच कार खरेदी करताना डीलरशी कसे व्यवहार करावेत आणि शोरूममधून कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन (PDI) का आवश्यक आहे आणि ते कसे केले जाते याविषयीदेखील माहिती देणार आहोत.
कार खरेदी करताना डीलर्सकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी टिप्स…
१) कार डीलर्स शोरूममध्ये काही कार टेस्ट मॉडेल म्हणून ठेवतात; ज्यांचा वापर ग्राहकांना टेस्ट ड्राइव्ह देण्यासाठी केला जातो. अनेकदा टेस्ट ड्राइव्हदरम्यान कार डॅमेज होतात किंवा खराब होतात. डीलर्स अशा कार दुरुस्त करून नवीन ग्राहकांना विकतात.
२) काही वेळा नवीन कार ट्रान्सपोर्टेशनदरम्यान डॅमेज होतात किंवा त्यांच्या बाहेरील भागाला डेंट येतो. अशा कारदेखील काही डीलर्स दुरुस्त करतात आणि ग्राहकांना न सांगता विकतात.
३) अनेकदा मागणीअभावी अनेक कार डीलरच्या स्टॉकयार्डमध्ये उभ्या असतात. धूळ, पाणी, माती अशा अनेक कारणांमुळे या कार खराब होतात, रंग उडतो आणि टायरही खराब होऊ लागतात. डीलर्स अशा कारदेखील ग्राहकांना विकतात.
४) काही वेळा कारच्या काही व्हेरियंटसाठी वाट पाहावी लागते. अशा वेळी डीलर्सवर कारचा पुरवठा पूर्ण करण्याचा दबाव असतो. पण, घाईगडबडीत पुरवठा केल्या गेलेल्या कार काही सदोष असतात; ज्या नंतर दुरुस्त करून ग्राहकांना विकल्या जातात.
PDI का आवश्यक आहे आणि ते कधी केले पाहिजे?
PDI म्हणजे प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन. ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये कारच्या डिलिव्हरीपूर्वी तपासणीची सुविधा असते. त्यामध्ये कारचे इंटेरियर, एक्स्टेरियर, इंजिन आणि सर्व फीचर्स नीट काम करीत आहेत की नाही हे तपासले जाते. पीडीआय करून कारमध्ये काही प्रॉब्लेम आहे की नाही हे कळू शकते. कार डीलरला आधीच माहीत असते की, कारमध्ये काय समस्या आहेत आणि डिलिव्हरीपूर्वी ग्राहकापासून त्या कशा लपवायच्या. त्यामुळे वाहनाची नोंदणी होण्यापूर्वीच कारचा PDI करणे आवश्यक आहे.
डीलर स्वतः पीडीआय करतो किंवा डीलरकडून कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी ग्राहक स्वतःदेखील कारचा PDI करू शकतो. त्यात कारची कसून तपासणी केल्यानंतर त्यावर PDI बॅज लावला जातो; जो दर्शवितो की, कार डिलिव्हरीसाठी तयार आहे.
PDI कसे करायचे ते जाणून घ्या… (How To Do Car PDI)
सर्वप्रथम एक चेक लिस्ट बनवा. या लिस्टमध्ये कारमध्ये तपासण्यासाठी प्रत्येक पॉइंट जसे की इंजिन, एक्स्टेरियर, इंटेिरयर, टायर, फीचर्स, कारचे पेंट इत्यादींची नोंद ठेवा. या लिस्टचा फायदा असा होईल की, कारचा कोणताही भाग तपासणीशिवाय राहणार नाही.
अशा प्रकारे तपासा कारचे इंटेरियर
१) कारमधील डॅशबोर्ड, अपहोल्स्ट्री, सीट व ग्लोव्ह्ज बॉक्सही व्यवस्थित तपासा.
२) फ्लोअर मॅट काढा आणि कार्पेटमध्ये ओलावा किंवा घाण आहे का ते तपासा.
३) कारचे सर्व आरसे तपासून बघा आणि त्यात काही क्रॅक किंवा स्क्रॅचेस नाहीत ना याची खात्री करून घ्या.
४) कारमधील सर्व स्विचेस व्यवस्थित काम करीत आहेत की नाही ते तपासा.
५) एअर कंडिशनर (AC) चालू करा आणि केबिन लवकर थंड होते की नाही ते पाहा.
अशा प्रकारे तपासा एक्स्टेरियर
१) कारच्या बाहेरील बाजूने काही ओरखडे किंवा डेंट आहेत का ते तपासा, कारच्या बंपर आणि कोनांवर विशेष तपासणी करा.
२) लहान-मोठे स्क्रॅच लपविण्यासाठी डीलर्स कार पॉलिश करतात. पण एकदा किंवा दोनदा धुतल्यानंतर कारवरील हे स्क्रेचेस दिसू लागतात. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी त्याच्या संपूर्ण बॉडी पार्ट्सवर हात फिरवून बघा. तुम्हाला डेंट किंवा स्क्रॅच असल्यास ते दिसून येईल. त्यामुळे पेंटवर्कदेखील दिसेल.
३) कारचे बॉडी पार्ट्स अगदी बारकाईने चेक करा. जर ते कुठे पुन्हा रंगवले गेले असतील, तर रंगामधील फरक तुम्हाला लगेच दिसून येईल.
४) कारचे सर्व कोपरे जसे की, दरवाजाच्या कडा आणि पॅनेलमधील अंतर, खिडकीच्या सभोवतालचा भाग आणि समोरचा बंपर व्यवस्थित तपासून पाहा.
५) कार बराच वेळ उभी राहिल्यास टायर सपाट होतात. नवीन कारचे टायर्सही फुटलेले असू शकतात.
६) चारही टायर्स नीट तपासा. रिम आणि अलॉय व्हीलदेखील पाहा. स्टेपनी, जॅक आणि इतर टूल्सदेखील नीट तपासून घ्या.
इंजिन, ओडोमीटर व इंधन
१) कारचे बोनेट उघडा आणि त्यातील फ्लुइट लेवल्स तपासा. इंजिन ऑइल, कूलंट, ब्रेक फ्लुइड व विंडस्क्रीन वॉशिंग फ्लुइड भरले पाहिजे.
२) इंजिन सुरू करा आणि थोडा वेळ चालू राहू द्या. काही गळती आहे का किंवा तुम्हाला असामान्य आवाज किंवा कंपन ऐकू येत आहे का ते पाहा.
३) त्याशिवाय एक्स्लेटर पॅडलवर पाय ठेवून दोन-तीन वेळा वेग वाढवा आणि इंजिनचा आवाज ऐका. इंजिनमधून काळा धूर तर निघत नाही ना हे पाहा.
४) नवीन कारचे ओडोमीटर रीडिंग ३०-५० किमीपेक्षा जास्त नसावे. जर रीडिंग ३०-५० किमीपेक्षा जास्त असेल, तर त्याबद्दल डीलरशी बोला.
कारच्या कागदपत्रांची पडताळणी करा
१) कारची सर्व कागदपत्रे जसे की रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, विमा संरक्षण, मॅन्युअल्स, वॉरंटी कार्ड, रोडसाइड असिस्टन्स नंबर आणि सर्व्हिस बुक तपासा.
२) डीलरकडून ‘फॉर्म क्र. २२’ घेऊन तपासणे आवश्यक आहे. त्यात कारचा इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक व कार मॅन्युफॅक्चरिंगचा महिना आणि वर्ष याविषयी माहिती असते.
३) व्हेईकल आयडेंटिफिकेशन नंबर (VIN), इंजिन क्रमांक व कारचा चेसिस क्रमांक डीलरने दिलेल्या कागदपत्रांशी जुळतो का ते तपासा.
चाचणी ड्राईव्ह घ्या
१) डीलर प्रतिनिधीसह एकदा चाचणी ड्राईव्ह घ्या. चाचणी ड्राइव्हदरम्यान कारचे स्टेअरिंग, गिअर शिफ्टर, ब्रेक व सस्पेंशन तपासा
२) कार जास्त आवाज करीत नाही ना, कार जास्त कंपन तर करीत नाही ना, इंजिनाचा आवाज या बाबी लक्षात घ्या.
१) सर्व काही तपासूनच कार तुमच्या नावावर रजिस्टर करा. नोंदणी केल्यानंतर त्या गाडीवर लक्ष ठेवा. कारला सर्व्हिस सेंटरमध्ये परत घेऊन जायला देऊ नका. कार घेऊन जाणारच असतील, तर त्याबरोबर कोणा तरी एका व्यक्तीला पाठवा. तुम्हाला संपूर्ण तपासणीचा व्हिडीओ बनवा.
जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या टिप्स…
१) जर डीलरने तुम्हाला PDI करण्यापासून रोखले, तर समजून घ्या. कारमध्ये काहीतरी गडबड आहे. आपण अशी कार खरेदी करण्यास नकार देऊ शकता.
२) पीडीआयमध्ये कोणतीही मोठी समस्या असल्यास, अशी सदोष कार न घेणेच शहाणपणाचे ठरेल. ती खबरदारी घेतल्यास भविष्यात तुमचा खिसा हलका होणार नाही.
३) डिलिव्हरीपूर्वी तपासणी करण्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे तुम्ही खराब झालेली कार खरेदी करण्यापासून वाचू शकता.
४) अनेकदा तुमच्या छोट्याशा चुकीमुळे नुकसान सहन करावे लागते किंवा नंतर शोरूमच्या फेऱ्या माराव्या लागतात.