टोर्क क्राटोस स्टार्टअप कंपनीने भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच केली आहे. भारतात टोर्क क्राटोसने इलेक्ट्रिक बाईक दोन प्रकारात लाँच केली आहे, क्राटोस आणि क्राटोस आर या नावाने सादर करण्यात आल्या आहेत. या मोटारसायकलींना स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. सुरुवातीची किंमत अनुदानानंतर १.०२ लाख रुपये आहे. ही किंमत दिल्लीच्या एक्स-शोरूमनुसार देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही इलेक्ट्रिक बाइक एका चार्जमध्ये १८० किमीची रेंज देईल. कंपनीने दोन्ही व्हेरियंटचे बुकिंग देखील सुरू केले आहे. डिलिव्हरीची माहिती देताना कंपनीने सांगितले की, या वर्षी एप्रिलमध्ये डिलिव्हरी केली जाईल. ही बाइक आजच ९९९ रुपयांमध्ये प्री-बुक करू शकता. या दोन्ही बाइकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीमध्ये क्राटोसची किंमत अनुदानासह १,०२,४९९ रुपये आणि क्राटोस आरची किंमत १,१७,४९९ रुपये आहे. यामध्ये पांढरा, निळा, लाल आणि काळा रंगाचा पर्याय देण्यात आला आहे.
बाइक फक्त चार सेकंदात ०-४० किमी प्रतितास वेग पकडते. या इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड १०५ किमी/तास आहे, एका चार्जमध्ये १८० किमीपर्यंत जाते. यात एक मजबूत बॅटरी आहे, जी ७.५ किलोवॅटची कमाल पॉवर आणि २८ एनएम टॉर्क जनरेट करू शकते. सुरुवातीच्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉन्च केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात आणखी शहरांचा समावेश केला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. या बाईकमध्ये फास्ट चार्जिंग ऑप्शन, जिओ फेन्सिंग आणि फाइंड माय व्हेईकल फीचर्स, मोटरवॉक असिस्टंट फीचर्स, क्रॅश अलर्ट, व्हेकेशन मोड आणि ट्रॅक मोड अॅनालिझ सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. या बाइकमध्ये ४ किलोवॅट लिथियम आयन बॅटरी आहे, जी ४८ वॅटचा व्होल्टेज देते.
ही इलेक्ट्रिक बाईक भारतीय बाजारपेठेत आधीपासून अस्तित्वात असलेल्या Revolt RV 400 (रु. १,१७,०२०), Joy E-Bike Monster (रु. १,०१,०५५) यांना टक्कर देईल. मात्र, या इलेक्ट्रिक बाइकमध्ये असे अनेक फिचर्स असून इतर बाईकमध्ये नाहीत.