Chennai Bike Crash Video At 114 kmph Ride: चेन्नईमध्ये मंगळवारी झालेल्या एका विचित्र अपघातामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. शहरातील तारणमणी परिसरात ही घटना घडली. भरधाव वेगाने बाईक चालवण्याचा मोह या दोन्ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी बेतला. ११४ किलोमीटर प्रति तास वेगाने बाईक चालवताना एका दुभाजकाजवळ ही बाईक छोट्या गाडीला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही मृत्यू झाला. हा संपूर्ण घटनाक्रम चालकाच्या हेल्मेटवर लावलेल्या कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मरण पावलेल्यांपैकी एका मुलाचं नाव हरी असं असून दुसऱ्याचं नाव प्रवीण असल्याची माहिती समोर आली आहे. हरी हा अवघ्या १७ वर्षांचा होता तर प्रवीण १९ वर्षांचा होता. तारामणी येथील १०० फूट रोडवर हा अपघात झाला. या दोघांनी ओएमआर रोडवर जाऊन व्हिडीओ शूट करण्याचं नियोजन केलं होतं. प्रवीण हा पहिल्या वर्षाला शिकत होता. तर हरीने नुकतीच १२ वीची परीक्षा दिली होती. हे दोघेही एक स्पोर्ट्स बाईक चालवत होते जिचा सर्वाधिक वेग १३० किमी प्रती तासापर्यंत जाऊ शकतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेचा २ मिनिटं २२ सेकेंदांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडीओमधील पहिल्या २० सेकंदांमध्ये या दोघांच्या बाईकचा अपघात होतो. पुढील दोन मिनिटं दोन सेकंद अपघातानंतर लोक जमा होणे, त्यांनी रुग्णवाहिकेला बोलावणे यासारख्या गोष्टींबद्दलच्या चर्चा ऐकू येत आहेत.

अपघातग्रस्त बाईक ही प्रवीणच्या मालकीची होती. त्याने काही महिन्यांपूर्वीच ही बाईक खरेदी केली होती. प्रवीणकडे गाडी चालवण्याचा वाहन परवाना नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली. “प्रवीण बाईक चालवत असताना हरी त्याच्या मागे बसला होता. त्यांनी १६ किमी प्रति तास वेगापासून या दोघांनी शुटींग सुरु केलं. बाईक ११४ किमी प्रति तास वेगाने धावत होती तेव्हा ते रेल्वे ब्रिजखाली होते,” असं पोलिसांनी सांगितलं.

चालकाच्या हेल्मेटवर लावलेल्या छोट्या कॅमेरामध्ये हा घटनाक्रम कैद झाला आहे. वेगाने गाडी चालवतानाचा व्हिडीओ शूट करुन तो सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या उद्देशाने या दोघांनी ही स्टंटबाजी केली होती. सोशल मीडियावर १ डिसेंबरपासून हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी या दोघांनी केलेलं धाडस करण्याची गरज नव्हती असं मत व्यक्त केलं आहे.

या ब्रिजखालील दुभाजकाजवळ एक छोटा ट्रक रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेला असतानाच प्रवीणची बाईक या ट्रकला धडकली आणि दोघेही खाली पडले. या दोघांना रोयापीठ सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two teenagers killed in chennai bike crash video shows they were filming 114 kmph ride scsg