जगात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची मोठी मागणी आहे. भारतातही गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. कार उत्पादक कंपन्यांनीही आपला मोर्चा इलेक्ट्रिक गाड्या निर्मितीकडे वळवला आहे. वाढती मागणी पाहता देशात अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. असं असलं तरी कारप्रेमींमध्ये टेस्लाच्या इलेक्ट्रिक गाड्यांबाबत उत्सुकता आहे. टेस्लाच्या गाड्या भारतात कधी येणार? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयात शुल्क माफ करण्यासाठी टेस्ला कंपनी प्रयत्नशील आहे. मात्र केंद्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. टेस्लाने गाड्यांची निर्मिती भारतात करावी असा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री क्रिष्ण पाल गुर्जर यांनी संसदेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘टेस्लाने गाड्या भारतीय बाजारात विकायच्या आणि नोकऱ्या चीनमध्ये तयार करायच्या, हे चालणार नाही’, असं केंद्रीय मंत्री क्रिष्ण पाल गुर्जर यांनी सांगितलं.कोणत्याही कर सवलतींचा विचार करण्याआधी टेस्लाने स्थानिक पातळीवर उत्पादन करणे आवश्यक असल्याचे सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे. मंगळवारी लोकसभेत टेस्लावरील प्रश्नाला उत्तर देताना, अवजड उद्योग राज्यमंत्री गुर्जर यांनी पुन्हा एकदा सरकारची भूमिका अधोरेखित केली आणि ते म्हणाले, “कंपनीला चीनमध्ये कामगार आणि भारतात बाजारपेठ हवी आहे. मोदी सरकारमध्ये हे शक्य नाही. आमच्या सरकारचे धोरण आहे की जर भारतातील बाजारपेठेचा वापर करायचा असेल तर भारतीयांना नोकरीच्या संधी द्याव्या लागतील.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस खासदार के सुरेश यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री क्रिष्ण पाल गुर्जर यांनी खडे बोल सुनावले. “आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांना म्हणायचं आहे की, भारतातील पैसे चीनमध्ये जावं असं वाटतं का? त्या कंपनीने सरकाच्या पॉलिसीनुसार अर्ज केलेला नाही. पॉलिसीनुसार अर्ज केला तर भारताचे दरवाजे खुले आहेत. भारतात कंपनी स्थापन करा, नोकऱ्या द्या, सरकारच्या महसुलात वाढ करा.”

रेनॉल्टने भारतात ८ लाख विक्रीचा टप्पा ओलांडला, Kwid आणि Triber गाड्यांनी दिली मोलाची साथ

भारतीय सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहेत. दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आल्या आहेत. मर्सिडिज बेन्झ, ऑडी, जग्वॉर लँड रोव्हर आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी कार निर्मात्यांनी उत्पादने आणली आहेत. टाटा मोटर्स, ह्युंदाई आणि एमजी मोटर इंडियाच्या इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. मात्र असं असूनही टेस्लाच्या गाड्यांबाबत कारप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

Volkswagen Recall: ऑडी, पोर्शेने परत मागवल्या ३२ हजार गाड्या, कारण…

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी अलीकडेच एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “सरकारसमोरील आव्हानांमुळे कंपनी अद्याप भारतात नाही. ” काही दिवसांपूर्वी काही राज्य सरकारांनी तत्परतेने टेस्ला कंपनीला आमंत्रण दिले होते. पश्चिम बंगालपासून पंजाब आणि महाराष्ट्र सरकारने निमंत्रणे पाठवली आहेत. मात्र आयात कर कपातीसारखे महत्त्वपूर्ण घटक केवळ केंद्र सरकारच ठरवू शकते. याक्षणी तरी टेस्ला स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यास तयार नसल्याचं दिसत आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister krishan pal gurjar on tesla rmt