Union Minister Nitin Gadkari tries out a Yulu Miracle electric 2 wheeler: देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी हे विजेवर चालणाऱ्या गाड्यांचा पाठपुरवठा करणारे मंत्री म्हणून ओळखले जातात. भारतामध्ये विजेवर चालणाऱ्या गाड्यांचा वापर वाढावा, पेट्रोल-डिझेलऐवजी पर्याय इंधनाचा वापर वाढावा यासाठी गडकरी वेगवगेळ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यात त्या गोष्टींचा स्वत: वापर करुन पाहतात. मध्यंतरी ते लोकसभेमध्ये हायड्रोजन कारने आले होते. आपण स्वत: याची चाचणी करणार म्हणत ते हायड्रोजनवर चालणारी गाडी घेऊन संसदेत पोहोचलेले. अशाचप्रकारे नुकतेच गडकरी हे युलू मिरॅकल ही गाडी चालवताना दिसले. ही एक छोट्या आकाराची विजेवर चालणारी दुचाकी आहे. मोबाईल अॅपवरुन ही कंपनी या छोट्या आकाराच्या विजेवर चालणाऱ्या गाड्या भाडेतत्वावर देते. एखाद्या ठराविक क्षेत्रापर्यंत या गाड्या वापरण्याची मूभा वापरकर्त्यांना असते.
गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. ही छोटीशी गाडी पाहून गडकरींना या गाडीवर बसण्याचा आणि तिची स्वत: चाचणी घेण्याचा मोह आवरला नाही. या दुचाकीचा सर्वाधिक वेग हा २५ किलोमीटर प्रती तास इतका आहे. या गाडीची रचना युनिसेक्स म्हणजेच पुरुष आणि माहिला दोघेही वापरु शकतात अशी आहे. ही गाडी वजनाने हलकी असावी यासाठी कंपनीने विशेष प्रयत्न केले आहेत. या गाडीचं स्टॅण्डही अगदी सहज वापरता येईल अशापद्धतीने बनवण्यात आल्याने महिलांना ही गाडी चालवणं आणि ती पार्क करणं फार सहज शक्य होतं असा कंपनीचा दावा आहे. गाडी उभी केल्यानंतर ती आपोआप लॉक होते, असं तंत्रज्ञान यामध्ये आहे.
कंपनीने या गाडीची पहाणी गडकरींनी केल्याचं काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन सांगितलं होतं. “हा आमचा सन्मान होता की आम्हाला आपले इलेक्ट्रीफाइंग (उत्साही या अर्थाने) नेते नितीन गडकरींची भेट घेता आली. त्यांना आम्ही युलूची भारतीय बनावटीची रचना, तंत्रज्ञान आणि इंजिनियरिंग वापरुन बनवण्यात आलेली दुचाकी दाखवली,” अशा कॅप्शनसहीत गडकरींचा या गाडीवर बसलेला फोटो शेअर करण्यात आलाय. तसेच या कॅप्शनमध्ये पुढे, “तसेच आम्ही या इलेक्ट्रीक स्कुटर्स भारताच्या १.५ कोटी जोडधंदा करणाऱ्या व्यक्तींना कशा फायद्याच्या ठरु शकतात, याबद्दलही चर्चा केली,” असंही कॅप्शनमध्ये म्हटलंय. गाडीची वैशिष्ट्ये ऐकून आणि गाडी पाहून नितीन गडकरींनाही गाडीवर बसून ती काही अंतरापर्यंत चालवून बघण्याचा मोह आवरला नाही. गडकरींनी ही गाडी काही अंतरापर्यंत चालवून बघितल्याचं कारटॉक डॉटकॉमने म्हटलंय.
या गाडीची रचना डिलेव्हरी बॉइजच्या दृष्टीने करण्यात आलीय. पाठीवर मोठी बॅग लावून प्रवास करणाऱ्यांसाठी ही गाडी अगदी उत्तम आहे. यामध्ये मग शॉपिंग वेबसाईट्सवरील वस्तूंची डिलेव्हरी करणाऱ्यांपासून ते स्वीगी, झोमॅटोसारख्या सेवा पुरवणाऱ्या डिलेव्हरी बॉइजच्या वापराच्या दृष्टीने गाड्यांची निर्मिती केली जाते. तसेच शहरांमध्ये प्रवासासाठी किंवा घर ते रेल्वे स्थानक अथवा बाजारामध्ये जाण्यासाठी वगैरे या गाड्या योग्य असल्याचं सांगितलं जातं.
या गाडीला एकच सीट आहे. सीटमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले असून गाडीवर कोणी बसलेलं असेल तर गाडीमध्ये किती बॅटरी शिल्लक आहे हे समोरच्या स्पीडोमीटरवर दाखवलं जातं. गाडीची बॅटरी फुटबोर्डजवळ आहे. गाडीच्या फूटबोर्डवर बरीच जागा असून उंच व्यक्तीही या गाडीवर सहज बसू शकते. गाडीची चाकं रबरची असून हा रबर पंक्चर प्रूफ आहे. गाडीच्या पुढील बाजूला हेडलॅम्प आहे. हा हेडलॅम्प वेदरफ्रूफ आहे.
किंमत किती?
ही गाडी सध्या ग्राहकांना विकली जात नसून केवळ मोबाईल अॅपवरुन तिची सेवा पुरवली जाते. पहिल्या ३० मिनिटांसाठी १० रुपये आकराले जातात. पुढे प्रत्येक तीस मिनिटांसाठी पाच रुपये आकारले जातात. १०० रुपये डिपॉझीट जमा करावं लागतं. तसेच ही बाईक भारतामध्ये थेट ग्राहकांना विकण्यासंदर्भात अद्याप तरी निर्णय झालेला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या ही कंपनी बंगळुरु, दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, पुणे आणि भुवनेश्वरमध्ये सेवा पुरवते.
भविष्यात विक्रीला आल्यास किंमत किती असेल?
ईव्ही इनफॉर्मर या वेबसाईटवरील मुलाखतीनुसार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी प्रत्येक बाईकसाठी ६०० डॉलर्स खर्च करते. म्हणजेच ४६ हजार रुपये खर्च करते. आता बजाज ऑटोच्या सहकार्याने कंपनी हा दर ५०० डॉलर्स म्हणजेच ४५ हजारांच्याही खाली आणण्याच्या प्रयत्नात आहे. बजाजने या कंपनीमध्ये ८ मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केलीय. त्यामुळे भविष्यात या गाड्या विक्रीला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गाड्या विक्रीस आल्या तरी त्यांची किंमत ४० हजारांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.