केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज मंगळवारी नवी दिल्ली येथे ‘भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राॅम’ (Bharat NCAP) लाँच करण्यात आलं आहे. आता भारतीय कंपन्यांच्या कार किती सुरक्षित हे पडताळण्यासाठी भारतातच क्रॅश टेस्टिंग सुरु केली जाणार आहे. या योजनेद्वारे सरकारचा उद्देश कार ग्राहकांना बाजारात उपलब्ध असलेल्या वाहनांच्या अपघात सुरक्षेचे तुलनात्मक मूल्यांकन करण्यासाठी सुविधा देणे हा आहे. म्हणजेच, एखादा ग्राहक कार घेण्याचा विचार करत असेल, तर गाड्यांच्या सेफ्टी रेटिंगच्या आधारे तो कोणती कार घ्यायची हे ठरवू शकेल.
आतापर्यंत कारच्या सेफ्टीची रेटींग करणारी ही क्रॅश टेस्ट परदेशात केली जात होती, आता ती देशातच होणार आहे. अलीकडे नवी कार विकत घेताना ग्राहक तिचं मायलेज, स्पीड, जागा यापेक्षा अधिक कार प्रवासासाठी किती सुरक्षित आहे, हे पाहतात. बदलत्या जीवनशैलीमुळे आता अपघातही खूप वाढले आहेत. त्यामुळे आता वाहनांची सेफ्टी अधिक महत्त्वाची झाली आहे. कार क्रॅश टेस्टींगमध्ये वाहनांना त्यांच्या सुरक्षा फिचर्सनूसार ० ते ५ स्टार रेटींग दिली जाते. त्यानुसार, कार विकत घेताना सेफ्टी फीचर्स पाहून ग्राहक सुरक्षित वाहन खरेदी करीत असतो. आता देशातच रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीने देशातच क्रॅश टेस्ट करून वाहनांना सेफ्टी रेटींग देण्यासाठी पॅरामीटर निश्चित केले आहेत.
(हे ही वाचा : रेनॉकडून महाराष्ट्रात ‘रेनॉ एक्स्पेरिअन्स डेज’ लाँच; ‘या’ ठिकाणी राबवण्यात येईल मोहिम)
कसे कार्य करणार?
- मोटारींना GNCAP प्रमाणे एडल्ट आणि चाइल्ड सुरक्षा रेटिंग दिले जाणार आहे.
- यावरून अपघाताच्या वेळी कार आणि त्यात बसलेल्या लोकांचे किती नुकसान होऊ शकते हे कळण्यास मदत होणार आहे.
- कारची क्रॅश चाचणी ५ टप्प्यांत केली जाणार आहे.
- कारच्या प्रत्येक स्तरावरील चाचणीसाठी गुण दिले जातील आणि त्याच्या आधारे त्याचे अंतिम रेटिंग निश्चित केले जाणार आहे.
कंपन्यांना काय फायदा होणार?
- त्यांच्या वाहनांची चाचणी देशातच केली जाईल, ज्यामुळे त्यांची वाहने परदेशात पाठवण्याचा खर्च वाचेल हा फायदा कंपन्यांना होणार आहे
- कार लाँच होण्याआधीच कंपन्या त्यांच्या कारची चाचणी घेण्यास सक्षम असतील, जेणेकरून ग्राहकांना त्याच्या सुरक्षिततेच्या रेटिंगबद्दल आगाऊ माहिती मिळू शकेल.
- देशात होणारी चाचणीही येथील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच होणार असून, त्याचा थेट फायदा कंपन्यांना होणार आहे.
तुम्हाला काय मिळणार?
- तुमच्यासाठी सुरक्षित कार निवडणे सोपे जाणार आहे
- देशातच चाचणी होत असल्याने लवकरच या गाड्यांना रेटिंग मिळणार आहे.
- भारतात ही चाचणी सुरू झाल्यानंतर कंपन्या आता अधिक सुरक्षित वाहनांच्या निर्मितीवर भर देणार आहेत.